जून-जुलैपासून सर्वसाधारपणे संसर्गजन्य आजाराची लागण सुरू होते. या आजारापासून संरक्षण कसे करावे? यासाठी आरोग्य खात्यातर्फे जनजागृती केली जात आहे. या मोहिमेंतर्गत आरोग्य कर्मचारी प्रत्येक शाळा आणि घरोघरी जाऊन आजार होऊ नये म्हणून काय खबरदारी घ्यावी, हे सांगत आहे. आरोग्य विभागातर्फे ही मोहीम प्रथमच राबवली जात असून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असल्याची माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. बी.एच. पारधी यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली. यावर्षी गेल्या सहा महिन्यात जिल्ह्य़ात डेंग्यूने एकही रुग्ण दगावला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पावसाळ्यामध्ये मलेरिया, डेंग्यू हे आजार बळावतात. हे आजार डासांमुळे होत असल्याने त्यावर आळा घालणे गरजेचे आहे. त्यासाठी जनजागृती ही महत्त्वाची ठरते. जनजागृती होत असल्यानेच मलेरियासारख्या आजारावर नियंत्रण मिळवता आले आहे. परंतु डेंग्यू आजारात मात्र वाढ होत आहे. त्यामुळे आरोग्य विभाग चिंताग्रस्त आहे. या आजारावरही नियंत्रण मिळवण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे. डासांपासून होणाऱ्या आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आरोग्य कर्मचारी प्रत्येक शाळेत जाऊन तेथील विद्यार्थ्यांना जागृत करत आहेत. उपकेंद्रातील आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आरोग्य सहायक, आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका त्यांच्या क्षेत्रांतर्गत येणाऱ्या शाळांमध्ये जातात. त्यांना डास कसे निर्माण होतात, डांसापासून कोणते आजार होतात व त्यावर कसे नियंत्रण मिळवावे, हे सांगतात. ही मोहीम ३१ जुलैपर्यंत सुरू राहणार आहे.
त्याचप्रमाणे आरोग्य खात्याचे कर्मचारी हिवताप आलेल्या रुग्णाच्या घरी जाऊन तपासणीसाठी रक्त घेतात. तेव्हा या कुटुंबातील सदस्यांना डासांपासून कसे संरक्षण करावे, याबद्दलची माहिती देतात. या मोहीमेमुळे मलेरिया आणि डेंग्यूचे आजार कमी होण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वासही डॉ. पारधी यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, एका डासाचे जीवनमान फक्त तीन आठवडय़ाचे असते. परंतु या दरम्यान एक डास पंधराशे डासांची निर्मिती करतो. या डासांची निर्मिती स्वच्छ पाण्यात होते. त्यामुळे घरात किंवा आजुबाजूला पाणी साचणार नाही, याची खबरदारी घ्यावी. एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. लहान मुलांचे शरीर झाकले जाईल, असे कपडे घालावे, असा सल्लाही त्यांनी दिला.
जून २०१४ मध्ये जिल्ह्य़ात एकूण २६ हजार ७२७ नागरिकांचे तपासणीसाठी रक्त गोळा करण्यात आले. त्यामध्ये २१ रुग्णांना मलेरिया झाल्याचे स्पष्ट झाले. १४ जुलैपर्यंत मलेरियाचे ६ रुग्ण आढळून आले. यादरम्यान डेंग्यूचा एकही रुग्ण आढळून आला नाही. २०१३ मध्ये जून महिन्यात २६ हजार २२१ नागरिकांच्या रक्ताचे नमुने गोळा करण्यात आले होते. त्यात ३० जणांना मलेरिया तर ४ जणांना मेंदूचा मलेरिया झाल्याचे स्पष्ट झाले होते. गेल्यावर्षी मलेरियाने फक्त एका रुग्णाचा मृत्यू झाला होता.
या वर्षी मलेरियाने कुणाचाही मृत्यू झाला नसल्याचे डॉ. पारधी यांनी स्पष्ट केले. जिल्ह्य़ातील रामटेक, काटोल आणि नरखेड तालुक्यात आणि नागपूरजवळील पाचगाव परिसरात इतर तालुक्याच्या तुलनेत मलेरियाचे रुग्ण मोठय़ा संख्येने आढळून येतात. मलेरियावर प्रतिबंधात्मक उपाय आहे. परंतु डेंग्यूवर अजूनही लस उपलब्ध झाली नसल्याने हमखास उपचार नाही. लक्षणे पाहूनच उपचार केले जातात. त्यामुळे डासांची उत्पत्ती होऊ न देणे, हाच यावर उपाय आहे.
यावर्षी जून महिन्यात जिल्ह्यात पाच डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. गेल्यावर्षी याच महिन्यात डेंग्यूचा फक्त एक रुग्ण आढळून आला होता. यावरून मलेरिया कमी होत असताना डेंग्यू मात्र वाढत असल्याचे आढळून आले होते.
गेल्या वर्षी २०१३ मध्ये १ जानेवारी ते ३० जून २०१३ पर्यंत डेंग्यूचे संशयित ४४ रुग्ण आढळून आले होते. त्यापैकी ९ जणांना डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यात एकाचा मृत्यू झाला. यावर्षी २०१४ मध्ये १ जानेवारी ते ३० जूनपर्यंत डेंग्यूचे ६१ संशयित रुग्ण आढळून आले होते. त्यात ७ जणांना डेंग्यू झाला होता. यावर्षी डेंग्यूने एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याचेही डॉ. पारधी यांनी स्पष्ट केले.