थेट मुंबईकरांशी संपर्क साधून त्यांच्या आरोग्याची काळजी वाहणाऱ्या पालिकेच्या संनिरीक्षण विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कामचुकारपणाला लगाम लावण्याची तयारी आरोग्य विभागाने सुरू केली आहे. पालिकेच्या विभाग कार्यालयांतील वैद्यकीय अधिकाऱ्यांना संनिरीक्षण विभागातील निरीक्षक आणि अन्वेक्षकांवर करडी नजर ठेवण्याचे आदेश आरोग्य विभागाने दिले आहेत. या आदेशांमुळे संनिरीक्षण विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची पळापळ सुरू झाली आहे.
मुंबईच्या कानाकोपऱ्यात फिरून साथीच्या आजाराचे रुग्ण हुडकून काढणे, ताप आलेल्या रुग्णांच्या रक्ताचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविणे, वेळप्रसंगी हिवतापाच्या रुग्णांवर उपचार करणे आदी कामे पालिकेच्या आरोग्य खात्यातील संनिरीक्षण विभागामधील निरीक्षक आणि अन्वेक्षक यांच्यावर सोपविण्यात आली आहे. निरीक्षक आणि अन्वेक्षकांना विभाग वाटून देण्यात आले असून त्या त्या विभागात फिरून तापाचे रुग्ण शोधण्याचे काम त्यांच्यावर सोपविण्यात आले आहे. त्याचबरोबर डासांच्या अळ्यांची उत्पत्तीस्थाने शोधण्याची जबाबदारीही त्यांच्याकडे आहे.
तापाचा रुग्ण आढळून येताच त्याच्या रक्ताचे नमुने घेऊन तात्काळ तपासणीसाठी पाठविण्यात येतात. एखाद्याला हिवताप अथवा डेंग्यू झाल्याचे रक्ताच्या नमुन्यांवरून आढळून आल्यानंतर संबंधिताला योग्य ते उपचार घेण्याचे मार्गदर्शन हीच मंडळी करतात. वेळप्रसंगी हिवतापाचा नियमित डोसही देण्याचे काम ते करतात. मात्र गेल्या काही महिन्यांपासून रुग्ण शोध मोहिमेत मरगळ निर्माण झाली आहे. निरीक्षक आणि अन्वेक्षक आपापली कामे योग्य प्रकारे करीत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने परिपत्रक काढून थेट पालिकेच्या विभाग कार्यालयांतील वैद्यकीय अधिकाऱ्यांना हे निरीक्षक व अन्वेक्षकांवर करडी नजर ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
आरोग्य खात्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांना आपल्यावर बारकाईने लक्ष ठेवण्याचे आदेश दिल्याने निरीक्षक व अन्वेक्षक धास्तावले असून ते आपापल्या विभागात दिसू लागले आहेत. परिणामी ढिसाळ झालेली पालिकेची वैद्यकीय सेवा पुन्हा एकदा प्रभावी होण्याची चिन्हे  आहेत.

करडी नजर
निरीक्षक आणि अन्वेक्षक आपापल्या विभागात सकाळी ९.३० वाजता पोहोचतात की नाही, किती वाजता कोणाची भेट घेतली याचा तपशील डायरीत नमूद करता का, डायरीमध्ये घर क्रमांक, चाळ-इमारतीचे नाव, निरीक्षणास कोणत्या विभागातून सुरुवात केली आणि काम कोठे संपले याची नोंद डायरीत करतात का, नियमितपणे विभागात असतात का, अन्वेक्षकाच्या डायरीवर निरीक्षकाची स्वाक्षरी असते का, प्रत्येक अन्वेक्षक आपापल्या विभागाचा नकाशा सोबत घेऊन जातात का, दररोज किती घरांना भेट दिली, किती लोकांची भेट घेतली, तापाचे रुग्ण किती सापडले, किती जणांच्या रक्ताचे नमुने घेतले, अन्वेक्ष आरोग्य केंद्राला नियमितपणे भेट देतात का, निरीक्षक आपल्या डायरीमध्ये नियमितपणे योग्य पद्धतीने नोंदणी करता की नाही आदी कामांवर नजर ठेवण्याची जबाबदारी वैद्यकीय अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे.