नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने प्रभागांतील नागरी आरोग्य केंद्र व विरंगुळा केंद्रात हिवताप, डेंग्यू अन्य आजारांवर मात करण्यासाठी जनजागृती व्हावी यासाठी विशेष जनजागृती मोहीम २६ जुलै  ते २ ऑगस्टदरम्यान राबवण्यात येणार आहे.
पावसाळयात मच्छरांचा व डासांचा प्रादुर्भाव नागरिकांच्या अनपेक्षित दुर्लक्ष केल्यामुळे वाढतो. त्यामुळे मलेरिया, डेग्यू यांसारखी आदी आजार उद्भवतात. यामुळे नागरिकांनी पावसाळयात पाणी साठून मच्छरांचा प्रादुर्भाव होणार नाही. याची काळजी घणे गरजेचे आहे. यासाठी आरोग्य विभागामार्फत शाळांमध्ये, बांधकामांच्या ठिकाणी जनजागृती कार्यक्रम राबवण्यात येतात.
प्रत्येक कुटुंबात ज्येष्ठांना मानाचे स्थान असते व त्यांनी सांगितलेल्या माहितीला अनुभवाची जोड असते. आरोग्य विभागाने यांचाच अभ्यास करून आजारांबाबतची जनजागृती शहरातील ज्येष्ठ नागरिकांमध्ये करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे जनजागृती मोहिमेची माहिती नागरी आरोग्य केद्रांच्या संबंधित वैद्यकीय आधिकाऱ्याने आपल्या कार्यक्षेत्रातील लोकप्रतिनिधींना द्यावी तसेच या मोहिमेचा कृती आरखडा व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल छायाचित्रांसह तयार करून विभागाच्या मुख्यालयास सादर करण्याचे परिपत्रक सर्व नागरी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना रवाना केले आहे.