ज्येष्ठ नागरिकांना अनेक कारणांमुळे उपचार घेण्यासाठी रुग्णालयात जाता येत नाही. नागपूर शहराच्या हद्दीतील अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी घरपोच आरोग्य सेवा सुरू करण्यात आली आहे. भारतात प्रथमच अशाप्रकारची सेवा सुरू करण्यात आली आहे. सामाजिक सेवेच्या भावनेतून सुरू केलेल्या या सेवेचा लाभ ज्येष्ठ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन इंडिया होम केअर मेडिसीनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय बजाज यांनी पत्रकार परिषदेतून केले.
ज्या ज्येष्ठ नागरिकांना कोणत्या तरी कारणास्तवर मुलांसोबत राहता येत नाही, सांभाळ करणारे कुणीही नाही, अशा सर्व ज्येष्ठांसाठी ही सेवा अत्यंत बहुमोल आहे. स्वतच्या आरोग्याची नियमित तपासणी व्हावी व वृद्धापकाळ कमीत कमी त्रासात जावा, अशी भावना असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना ८८८८ रुपये वार्षिक शुल्क भरून या योजनेचा लाभ घेता येणार आहे. ज्या नातेवाईकांना आपल्याकडील ज्येष्ठांसाठी ही योजना उपयोगाची आहे, असे वाटते ते शुल्क भरून ही सेवा घेऊ शकतात. या योजनेचे शुल्क अत्यल्प ठेवण्यात आले असून वर्षभराच्या सेवेचा विचार केल्यास दर तासाला फक्त एक रुपया एवढे शुल्क आकारले जाते. त्या तुलनेत या योजनेचे लाभ असंख्य असल्याचेही डॉ. बजाज यांनी स्पष्ट केले.
ज्यांची मुले भारताबाहेर किंवा परगावी किंवा दूर अंतरावर राहतात आणि घरी सांभाळणारे कुणीही नाही, दीर्घकाळापासून आजाराने पीडित असलेले व रुग्णालयात जाणे शक्य नसलेले ज्येष्ठ नागरिक, शस्त्रक्रियेनंतर बाहेर पडू न शकणारे नागरिक, उच्च रक्तचाप, मधुमेह, मूत्रपिंडाचे आजार, हृदयरोग, पक्षाघात, स्मृतीभंशने ग्रस्त असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना आहे. ८८८८ रुपये वार्षिक शुल्कामध्ये दर महिन्याला व वर्षांला १२ वेळा तज्ज्ञ डॉक्टर घरी जाऊन तपासणी करून योग्य सल्ला देणार आहे. तसेच प्रशिक्षित परिचारिका वर्षांत १२ वेळा घरी जाऊन तपासणी करतील. हिमोग्लोबीन, रक्तशर्करा, सीरम क्रियाटिनीन (मूत्रपिंडाची क्षमता तपासण्यासाठी) सिरम कोलेस्ट्रॉल, मूत्र तपासणी, आतडय़ातील रक्तस्त्राव व अन्य विकारासाठी ईसीजी, रक्तदाब आदी प्रकारच्या तपासण्या आधीच करून घेतल्या जाणार असून त्याप्रमाणे उपचार व सल्ला दिला जाईल. या तपासण्यांचा वेगळा खर्च लागणार नाही. प्रभावी असलेल्या धनुर्वाताच्या तीन लसी घरी येऊन दिल्या जातील.
या योजनेचा लाभ घेणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना असलेल्या आजारांचे निदान होऊन त्यांच्यावर औषधोपचार सुरू केला जाणार असल्यामुळे त्यांचे आरोग्य चांगले राहील व वृद्धापकाळ चांगला जाईल. या योजनेतील सेवा सकाळी ९ ते सायंकाळी ७ या वेळेतच दिल्या जाणार आहे. या योजनेत सहभाग न घेणाऱ्यांसाठी घरपोच आरोग्य सेवा उपलब्ध होऊ शकेल. त्यासाठी आधार कार्डची झेरॉक्स प्रत, पत्ता, फोन क्रमांकासह १४९९ रुपये जमा करणे आवश्यक आहे. ही सेवा देण्यासाठी शहरात २४ डॉक्टर्स तयार राहणार आहेत. त्यामध्ये बहुतांश सर्वच आजाराचे तज्ज्ञ राहतील. ही सेवा घेण्यासाठी आतापर्यंत १०० ज्येष्ठांनी नोंदणी केली असल्याचे डॉ. बजाज यांनी सांगितले.
एवढय़ा अल्प रकमेत ही सेवा देणे परवडत नाही. परंतु सामाजिक भावनेतून ही सेवा दिली जात आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेला डॉ. स्वाती बजाज, डॉ. अर्चना चॅटर्जी, डॉ. अर्चना देशपांडे, डॉ. जसगीत चौधरी, डॉ. पंकज गजभिये उपस्थित होते.