ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य केंद्रस्थानी ठेवत केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने विविध योजनांची आखणी करण्यात येत आहे. मात्र सरकारच्या ध्येयधोरणांना बगल देत आपले उखळ पांढरे करून घेण्याचा प्रयत्न इतर शासकीय आस्थापनांच्या वतीने होत आहे. जिल्ह्यातील अनेक आरोग्य केंद्रातील आरोग्यसेवक, शिपाई तसेच इतर कर्मचारी विविध आस्थापनांवर प्रतिनियुक्तीवर काम करत असल्याने अपुऱ्या मनुष्यबळावर काम करण्याचे आव्हान आरोग्य यंत्रणेसमोर आहे. परिणामी, ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य अडचणीत सापडले आहेत.
जिल्ह्य़ातील १०३ प्राथमिक आरोग्य केंद्रात साधारणत: १०० हून अधिक आरोग्यसेवक तसेच शिपाई किंवा अन्य कर्मचारी काम करतात. मुळात ग्रामीण भागात आणि त्यातही आदिवासीबहुल परिसरात वैद्यकीय सेवा बजाविण्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांसह सारेच नाखूश असतात. कर्मचाऱ्यांच्या कूपमंडूक प्रवृत्तीमुळे कुपोषण, माता-बाल मृत्यू, अपघाती मृत्यू यावर नियंत्रण मिळविण्यात सरकारला यश आलेले नाही. प्रतिकूल परिस्थितीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने आरोग्य व्यवस्था धडपड करत आहे. वाहत्या गंगेत हात धुण्याची सवय असलेल्या सरकारी आस्थापनांनी चोख काम बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रतिनियुक्तीवर विविध आस्थापनांमध्ये सामावून घेतल्याने ग्रामीण भागातील नागरिक आणि त्यांचे आरोग्य नाहक वेठीस धरले गेले आहे.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात ‘फार्मासिस्ट’ म्हणून नोंद असणारे महेश पैठणकर सध्या प्रतिनियुक्तीवर आ. जयंत जाधव यांचे स्वीय साहाय्यक म्हणून काम पाहत आहेत. तसेच इगतपुरी तालुक्यातील वैतरणा आरोग्य केंद्र परिसर हा आदिवासीबहुल भागातील आहे. या ठिकाणी पाच वर्षांपासून महिला कर्मचारी शिंदे आणि पुरुष कर्मचारी पगारे हे शिपाई तसेच अन्य कर्मचारी पदावर रुजू आहेत. मात्र त्यांना प्रतिनियुक्तीवर अनुक्रमे महसूल आयुक्त कार्यालयातील एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याच्या बंगल्यावर तसेच जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातील एका अधिकाऱ्यांकडे प्रतिनियुक्तीवर सामावून घेण्यात आले आहे. हे दोघे कर्मचारी आरोग्य केंद्रावर महिनाभर गैरहजर असतात आणि महिन्याचा एका विशिष्ट तारखेला पगार घेण्यासाठी आणि ‘मस्टर’वर स्वाक्षरी करण्यासाठी नाशिकहून वैतरणाला जातात. मात्र त्यांच्या गैरहजेरीत दुसऱ्या कोणाची त्यांच्या जागेवर प्रतिनियुक्ती करण्यात आलेली नाही. त्र्यंबकेश्वर येथील ठाणापाडा आरोग्य केंद्रावरील वाहनचालक ज्याला जननी शिशू सुरक्षा योजनेसह १०८ या आप्तकालीन रुग्णवाहिका सेवेसाठी नियुक्त करण्यात आले आहे, तो सध्या महसूल आयुक्तालयात काम करतो. त्याचा पगार ठाणापाडा आरोग्य केंद्रात जमा होत असला तरी त्याची सेवा मात्र महसूल आयुक्तालयात आहे. त्याच्या जागी वाहनचालक म्हणून वेळप्रसंगी बोलविणाऱ्या व्यक्तीला रुग्ण कल्याण समितीच्या निधीचा वापर करून मानधन देण्यात येते.
आरोग्य विभागातील शिपाई तसेच कारकून यांना प्रतिनियुक्तीवर विविध आस्थापनांमध्ये मोठय़ा प्रमाणावर सामावून घेण्यात येत असल्याने ‘आधीच हौस, त्यात पडला पाऊस’ अशी परिस्थिती आरोग्य विभागाची झाली आहे. अपुऱ्या मनुष्यबळाने कुठल्याच योजना आरोग्य विभागाला प्रभावीपणे राबविता आलेल्या नाहीत. त्यात उपलब्ध मनुष्यबळ इतरत्र गेल्याने नागरिकांच्या आरोग्याचे भवितव्य अधांतरी बनल्याचे पाहावयास मिळत आहे.