बालकांच्या आरोग्याबाबत पालकांना जागृत करण्याची गरज आहे, असे मत बालरोग तज्ज्ञांनी कार्यशाळेत व्यक्त केले. बालरोग तज्ज्ञ संघटना, शाखा नागपूर आणि हैदराबाद येथील क्रिष्णा इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेस यांच्या संयुक्त विद्यमाने हॉटेल सेंटर पॉइंटमध्ये ‘लहान मुलांचे हृदयरोग’ या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
नवजात मुलांपैकी १० टक्के मुलांना हृदयाचे विविध आजार होतात. त्यात हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या धमण्यात अडथळा येणे, धमण्या आकाराने व लांबीने लहान असणे, श्वास घेताना त्रास होणे, फुफ्फुसाला रक्त पुरवठा न होणे आदींचा समावेश असतो. या आजारांचे वेळेवर निदान होत नसल्याने भारतात दरवर्षी ७० ते ८० हजार बालके दगावतात. वेळेवर योग्य निदान झाले तर मुलांचे प्राण वाचवणे शक्य आहे, यावरही कार्यशाळेत मंथन झाले. अत्यंत गंभीर आजार असल्यास बालकांना जीवन प्रणालीवर ठेवले जाते. परंतु ही जीवन प्रणाली प्रतिसाद देत नसल्यास काय करावे, यावरही या कार्यशाळेत उहापोह झाला. बाळ बोलू शकत नसल्याने पालकांना आजाराची कल्पनाच येत नाही. त्यातच अनेक गैरसमज असल्याने मुलांना रुग्णालयात नेले जात नाही. त्यामुळे मुले दगावतात. पालकांनी बाळाला त्वरित रुग्णालयात नेणे आवश्यक आहे. त्यासाठी जनजागृती करणे महत्त्वाचे असल्याचे ठरवण्यात आले.
सध्या बाळरोग तज्ज्ञ मोठय़ा प्रमाणात असले तरी बाळ हृदयरोग शस्त्रक्रिया तज्ज्ञांची कमतरता आहे. बाळाला हृदयरोग असल्याचे आढळून आले तरी शस्त्रक्रिया तज्ज्ञच नसल्याने वेळेवर शस्त्रक्रिया होत नाही. त्यामुळे बाळ हृदयरोग शस्त्रक्रिया तज्ज्ञांची संख्या वाढवणे व सर्व सुविधायुक्त हॉस्पिटल निर्माण करण्याची आवश्यकता आहे, यावरही चर्चा झाली. महिला गर्भवती असताना वेळोवेळी तपासणी केली जात नाही.
त्यामुळे शरीरात नेमकी कोणती कमतरता आहे, हे कळत नाही. गैरसमज व आर्थिक टंचाईमुळे गर्भवती महिला पोटातील गर्भाकडे दुर्लक्ष करतात. अशावेळी तपासणी करून अशा महिलांना लोहाच्या गोळ्या, योग्य आहार मिळाला तर निरोगी बाळ जन्मास येऊ शकते, यावरही चर्चा झाली.
या कार्यशाळेत बाळरोग तज्ज्ञ संघटना, नागपूर शाखेचे अध्यक्ष डॉ. आर.जी. पाटील, सचिव डॉ. गिरीश चरडे, अभय भोयर, डॉ. संदीप चौरसिया, डॉ. बोकडे, डॉ. विजय धोटे, हैदराबाद येथील केआयएमस हॉस्पिटलमधील बाळ शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ. अनिलकुमार धर्मापूरम यांनी विविध विषयांवर विचार
मांडले. या कार्यशाळेत शहरातील बाळरोग तज्ज्ञ सहभागी झाले होते.