गुजरातकडे वेगाने सरकलेले ‘निलोफर’ वादळ किनाऱ्यावर थडकण्याआधीच शमत आले आहे. सुरुवातीला साधे वादळ वाटणारे निलोफर चार दिवसांपूर्वी महाचक्रीवादळात रूपांतरित झाले होते. हे वादळ गुजरात किनारपट्टीवर धडकणार अशा धोक्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र अखेर हे वादळ पेल्यातीलच ठरले. ओमानकडे जाताना मार्ग बदलून गुजरातकडे वळलेले हे वादळ गुरुवारी बरेच मंदावले. या वादळातील वाऱ्यांचा वेग १७५ किलोमीटर प्रतितासांवरून ८० किलोमीटर प्रति तासांवर आला होता. हे वादळ गुजरात किनाऱ्यावर पोहोचण्याआधीच त्यातील वाऱ्यांचा वेग ४० ते ५० किलोमीटर प्रतितासांवर येऊन त्याचे कमी दाबाच्या पट्टय़ात रूपांतर होईल. यामुळे सौराष्ट्र, उत्तर गुजरात तसेच राजस्थानमधील काही भागात पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या वादळामुळे मुंबई तसेच राज्यात वातावरणात आलेला गारवा जाऊन पुन्हा एकदा तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याचा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे.