एप्रिलच्या उत्तरार्धात उत्तर महाराष्ट्रातील तापमानाचा पारा झपाटय़ाने वर चढला असून प्रचंड उष्म्याने जनजीवनावर विपरित परिणाम झाला आहे. राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद होणाऱ्या भुसावळ तालुक्याने यंदाही ४२ अंशाची पातळी ओलांडली असून नाशिक, मालेगाव, धुळे, जळगाव व नंदुरबार या भागातील तापमानही त्याच दिशेने मार्गक्रमण करत आहे. नाशिकचा पारा प्रथमच ४० अंशांच्या पुढे गेला असताना जळगावने ४२.३ टप्पा ओलांडल्याने नागरीक हैराण झाले आहेत. अमळनेर तालुक्यात या आधीच ४४ अंशांचा टप्पा पार केला आहे. टळटळीत उन्हाचा जोरदार तडाखा बसत असल्याने दुपारच्या सुमारास बाजारपेठेतील वर्दळ थंडावली आहे. त्यातच अचानक वीज गायब होण्याचे घडणारे प्रकार अन् ग्रामीण भागात सलग कित्येक तास भारनियमन होत असल्याने नागरिक अधिकच हैराण झाले आहेत.
उत्तर महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने टळटळीत उन्हाळ्याची दाहकता जाणवत आहे. मार्चपासून वाढणारे तापमान एप्रिलच्या मध्यावर ही उंची गाठते, असा सर्वसाधारण अनुभव. यंदा सलग काही महिन्यांपासून अवकाळी पावसाचा तडाखा बसत आहे. थंड हवेसाठी प्रसिद्ध असणाऱ्या नाशिकने सोमवारी प्रथमच ४० अंशाचा टप्पा ओलांडला तर जळगावने हा टप्पा आधीच ओलांडला आहे. जळगावसह मालेगाव, धुळे व नंदुरबार भागात उष्णतेची लाट आल्याची स्थिती आहे. उन्हाच्या तडाख्याने बहुतांश नागरिकांनी दुपारच्या वेळी घराबाहेर न पडणे पसंत केले आहे. यामुळे दिवसभरातील पाच ते सहा तास सर्व प्रमुख बाजारपेठा, रस्त्यांवर वर्दळ कमी झाल्याचे दिसते. प्रमुख बाजारपेठांमधील व्यवहार थंडावतात. शासकीय कार्यालयांत दुपारी कामकाजात संथपणा आल्याचे पहावयास मिळते. जळगाव हा उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक तापमानाची नोंद होणारा जिल्हा. होळीनंतर या भागातील तापमानात वाढ होते. यंदा मात्र प्रारंभीच्या कालात ढगाळ वातावरण व उन-सावलीच्या खेळामुळे तापमान ४० अंशांच्या आत राहिले होते. त्यामुळे जळगावकरांना प्रारंभी फारशी न जाणवलेली उन्हाची झळ एव्हाना चांगलीच बसू लागली आहे. भुसावळ तालुक्यात तापमानाची सर्वाधिक म्हणजे ४२ अंशांची नोंद झाली आहे. त्या अधिक म्हणजे ४२.३ अंश तापमान जळगावमध्ये नोंदले गेले आहे. तापमानाने आरोग्यावर विपरित परिणाम होऊ नये म्हणून योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना वैद्यकीय तज्ज्ञांकडून केल्या जात आहेत. शासकीय रुग्णालयांत उष्माघात कक्षांची स्थापना करून आरोग्य विभागाने सज्जता राखली आहे.
धुळे जिल्ह्यातील तापमानाचा पारा जवळपास ४० अंशांवर पोहोचल्याने जनजीवनावर विपरित परिणाम झाला आहे. सकाळी साडे अकरानंतर दुपारी साडे चार ते पाच वाजेपर्यंत मुख्य बाजारपेठेत शुकशुकाट दिसतो. थंडपेय व खाद्यपदार्थ विक्रेत्यांनाही उन्हाच्या झळा कमी होण्याची वाट पहावी लागते. त्यामुळे काही विक्रेत्यांनी ऊसाचा रस, कुल्फी, बर्फाचे गोळे गल्लीबोळात जावून विक्री करण्यावर भर दिला आहे. उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी विशिष्ट प्रकारची जाळी लावून उष्णता नियंत्रित ठेवण्याचे प्रयत्न केले जात आहे. घराच्या मुख्य दरवाजासमोर, अंगणात किंवा बागेत रोपांच्या वृक्षांच्या संरक्षणासाठीही अशा जाळीच्या विशिष्ट कापडाचा वापर केला जात आहे. दुभत्या जनावरांचे उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी गोठय़ाच्या अवती-भवती धान्याच्या रिकाम्या गोण्यांच्या मोठय़ा चादर बनवून लावण्यात आल्या आहेत. या गोण्यांवर पाण्याचा शिडकावा करून गारवा निर्माण केला जातो. उकाडय़ाबरोबर धुळेकरांसमोर पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले आहे. वाळाची तावदाने, टोप्या, पंखे, तत्सम वस्तुंच्या विक्रीत चांगली वाढ झाली आहे. तसेच आईस्क्रिम, थंड पेय, कलिंगड यांची मागणी वधारली आहे.
शहरी भागात अधुनमधून वीज गायब होत असल्याने नागरिक त्रस्त असताना ग्रामीण भागात दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे. वीज नसल्याने उकाडय़ापासून सुटका करण्यासाठी वेगवेगळे पर्यायी मार्ग शोधले जात आहेत. उत्तर महाराष्ट्रातील ग्रामीण भागात सहा ते सात तास भारनियमन केले जात असल्याने ग्रामस्थ हैराण झाले आहेत. नाशिक शहरात उकाडा सुसह्य करण्यात वीज कंपनीची चांगली मदत झाली आहे. दोन ते तीन दिवस काही भागात अचानक वीज गायब झाली असली तरी ते भारनियमन नसल्याचे वीज कंपनीने म्हटले आहे. ग्रामीण भागात सलग होणाऱ्या भारनियमनाने जनजीवन कोलमडून पडले आहे. विहिरीत पाणी असूनही पिकांना ते देता येत नाही. सलग केले जाणारे भारनियमन रद्द करून त्या ऐवजी ते टप्प्याटप्प्याने लागू करणे आवश्यक असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. धुळे, जळगाव व नंदुरबार शहरातही कमी-अधिक प्रमाणात भारनियमन होत असल्याने नागरिक, व्यावसायिक व व्यापारी त्रस्त झाले आहेत.