लोकसभा, विधानसभा निवडणुकीपेक्षा जास्त पोलीस बंदोबस्त बुधवारी होणाऱ्या नवी मुंबई पालिका निवडणुकीतील मतदानासाठी नवी मुंबईत ठेवण्यात आला आहे. राज्य राखीव पोलीस दलाच्या तीन तुकडय़ा तैनात करण्यात आल्या आहेत. परिमंडळ दोनच्या पोलिसांना नवी मुंबईत बंदोबस्तासाठी बोलाविण्यात आल्याने दोन हजार १२५ पोलीस बुधवार व गुरुवारी शहरात तळ ठोकून बसणार आहेत. यात सहा उच्च अधिकारी व ५० वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहणार आहेत.
बारा लाख लोकवस्तीच्या नवी मुंबईत बुधवारी पाचवी सार्वत्रिक निवडणूक होत असून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. प्रचाराच्या दरम्यान तीन ठिकाणी हाणामारी व पैसे वाटपाच्या घटना घडलेल्या आहेत. गेली काही वर्षे शांत असलेला नवी मुंबईतील काही भाग हा संवेदनशील आहे. त्यामुळे पोलीस दिघा, ऐरोली, चिंचपाडा, कोपरखैरणे येथील ३२ मतदान केंद्रांवर विशेष लक्ष ठेवणार आहेत. माजी मंत्री गणेश नाईक यांच्या अस्तित्वाची लढाई असल्याने त्यांचे कार्यकर्ते आक्रमक राहणार असून नाईक यांच्या हातातून सत्ता खेचून घेण्यासाठी विरोधक हातघाईवर आले आहेत. त्यामुळे काही ठिकाणी हाणामारी अथवा वातावरण तंग होण्याचा प्रसंग उद्भवणार आहेत. त्यामुळे पोलिसांनी रविवारपासून सर्व नोडमध्ये रुट मार्च काढण्यास सुरुवात केली आहे. मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे, असे आवाहन आयुक्त के. एल. प्रसाद यांनी केले आहे. शहरात गस्त घालण्यासाठी ३८ वेगवेगळी पथके कार्यरत असून ही पथके सोमवारपासून कार्यरत होणार आहेत. पोलिसांच्या तपासणी नाक्यावर दुचाकी तसेच संशयास्पद वाहनांची तापासणी या पथकांकडून केली जाणार आहे. ही पालिकेची निवडणूक असली तरी या ठिकाणी प्रमुख पक्षांच्या उमेदवारांचा खर्च सरासरी २५ लाख रुपये असून काही तगडय़ा उमेदवारांचा हा आकडा कोटय़वधीमध्ये जाणार आहे. त्यामुळे मतदारांना आमिष दाखविण्यासाठी पैशाची ने-आण करणाऱ्या वाहनांची चौकशी केली जाणार आहे. १६१ पोलीस अधिकारी मतदान केंद्रावर जातीने उपस्थित राहणार आहेत.