उरण तालुक्यात झालेल्या धुवाधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शहरातील रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले आहे. त्यामुळे शाळेत जाणारी मुले व साचलेल्या पाण्यामुळे दुचाकी वाहने बंद पडल्याने नागरिकांनाही त्रास सहन करावा लागत आहे. गटारात पडून अपघात होऊ नये याकरिता संपावर असतानाही पावसाचे प्रमाण वाढल्यानंतर नगरपालिकेचे कर्मचारी नागरी व विद्यार्थ्यांच्या संरक्षणासाठी गटाराशेजारी उभे राहून सुरक्षा करताना पाहावयास मिळत आहेत.
उरण तालुक्यात मागील आठवडाभरापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे  तालुक्याला पाणीपुरवठा करणाऱ्या रानसई धरणातील पाणीसाठय़ात वाढ झाल्याने एमआयडीसीने लागू केलेली आठवडय़ातील दोन दिवसाची पाणीकपात एक दिवसावर आणली आहे. त्यामुळे उरणमधील नागरिकांना दिलासा मिळालेला आहे. तसेच तालुक्यातील शेतीच्या कामालाही वेग आलेला आहे. मंगळवारी रायगड जिल्ह्य़ात झालेल्या पावसापैकी सर्वाधिक १६० मिलिमीटर पावसाची नोंद येथे झालेली आहे. अनेक गावांतील पाण्याचा निचरा होत नसल्याने गावातील तसेच उरण शहरातील सखल भागात काही प्रमाणात पाणी साचल्याने घरात पाणी गेल्याच्या घटना घडल्या आहेत. त्याचप्रमाणे उरण-पनवेल या मुख्य रस्त्यावर पाणी साचल्याने वाहनांची कोंडी सुरू आहे.