मागील तीन दिवसांपासून उरण तालुक्यात पावसाच्या सरी पडत असून चोवीस तासांत उरण तालुक्यात धुवाधार पाऊस झाला असून त्यामुळे तालुक्यातील वातावरण बदलून थंडा थंडा कूल कूल बनले आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून शेतीच्या कामांना जोमाने सुरुवात झाली आहे. पावसाच्या संततधारेमुळे उरण शहरातील अनेक ठिकाणी पाणी साचल्याने उरणमधील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
उरण तालुक्यात मागील चोवीस तासांत ९३ मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. आतापर्यंत तालुक्यात २१५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. चोवीस तास सलग कोसळणाऱ्या पावसामुळे उरणमधील जनजीवनावरही परिणाम झालेला असून उरण शहरातील गटारे तुडुंब भरल्याने अपना बाजार चौक व येशी देवी येथील रस्त्यावर पाणी साचलेले होते. त्याचप्रमाणे उरण-पनवेल रस्त्यावरील फुंडे हायस्कूल ते नवघर फाटा यादरम्यानच्या मुख्य रस्त्यातही पाणी साचल्याने दुचाकी वाहने बंद पडण्याच्या घटना घडल्याने या मार्गाने प्रवास करणाऱ्यांना त्रास सहन करावा लागला. दुसरीकडे महिनाभर दडी मारल्याने पावसाअभावी शेतकरी चिंतेत होता. मात्र पावसाने पुन्हा एकदा जोरदार आगमन केल्याने शेतीसाठी लागणारे पाणी उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून शेतीच्या मशागतीची, भातपिकांच्या लावणीची कामे सुरू झाली आहेत.