आज पहाटे अवघ्या तीन तासांत विजांच्या कडकडाटांसह १५२ मि.मी. पाऊस कोसळल्याने शहरातील सर्व प्रमुख रस्ते जलमय झाले असून वस्त्या सलग चौथ्यांदा पाण्याखाली आल्या असून शेकडो घरे व झाडे कोसळली आहेत. चंद्रपूर-गोंदिया चांदाफोर्ट रेल्वेलाइनवरील रूळ वाहून गेल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णत: बंद झाली आहे. पुलावर पाणी असल्याने बल् लारपूर बायपास, हैदराबाद व भोयेगाव मार्ग बंद आहे. इरई धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत.
अतिवृष्टी व मुसळधार पावसाने या जिल्हय़ात अक्षरश: कहर केला आहे. जून व जुलैमध्ये सलग तीन वेळा आलेल्या पुरातून शहरातील १७ प्रभाग व ५० वस्त्यांमधील २० हजार पूरग्रस्त संसारातून सावरत नाही, तोच आज पहाटे पावसाने झोडपल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. आज पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. हा आवाज इतका मोठा होता की जणू काही मोठा भूकंपच झाला. पहाटे ४.३० ला सुरू झालेला हा पाऊस सकाळी ७ वाजेपर्यंत सुरू होता. अवघ्या तीन तासांत १५२ मि.मी. पावसाची नोंद घेण्यात आली. या पावसामुळे शहरातील सर्व प्रमुख रस्ते जलमय झाले होते. महात्मा गांधी मार्गापासून तर जटपुरा गेटपर्यंत पाणी होते. आझाद बाग, सिटी हायस्कूल ते धनराज भवन, कस्तुरबा मार्ग, गिरनार चौक, अंचलेश्वर गेट परिसरात कंबरभर पाणी होते. झरपट नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहत होती. अंचलेश्वर मंदिर, डॉ. पालीवाल हॉस्पिटल, टायर मोहल्ल्यात पाणी गेल्याने अनेक घरे कोसळली, तर इरई व झरपट नदी काठावरील भिवापूर प्रभागातील भंगाराम परिसर, पठाणपुरा गेटबाहेरील परिसर, दादमहाल वॉर्ड, विठ्ठल मंदिर प्रभागातील परिसर, रहेमतनगर प्रभाग व परिसर, चौराळा मार्गालगत इरई नदी काठावरील परिसर, सिस्टर कॉलनी, महसूल कॉलनी परिसर, नगिनाबाग प्रभाग, हवेली गार्डन परिसर, वडगाव प्रभाग, महाकाली प्रभाग गुरुद्वारामागील परिसर, तसेच पठाणपुरा, विठ्ठल मंदिर, गोपालपुरी, बालाजी वॉर्ड, बिनबा वॉर्ड, ठक्करनगर, महसूल कॉलनी, जगन्नाथबाबानगर, दाताळा, विश्वकर्मा कॉलनी, प्रज्ञा चौक, गुलमोहर कॉलनी, जीवनज्योती कॉलनी, आकाशवाणी, स्नेहनगर, हवेली गार्डन, वडगाव, मुस्तफा कॉलनी, दानववाडी, अंचलेश्वर वॉर्ड, गौतमनगर, राजनगर, ओंकारनगर, गुरुमाऊली वॉर्ड, बगड खिडकी, चहारेवाडी, भिवापूर, लालपेठ एरिया, मातंग मोहल्ला, निंबाळकर वाडी, केंद्रीय उत्पादन शुल्क विभाग वसाहत, स्वावलंबीनगर, संत गाडगेबाबानगर, ख्रिश्चन कॉलनी, महात्मा फुले चौक, प्राध्यापक कॉलनी, शिक्षक कॉलनी, चैत्रबन, कृष्णाबन, काजीपुरा, हनुमान खिडकी, किसान वसाहत, मिलिंदनगर, फुकट मोहल्ला, गावंडे मोहल्ला, आदिवासी वॉर्ड या वस्त्या पाण्याखाली होत्या.
इंदिरानगर, संजयनगर, अष्टभुजा वॉर्ड, एमईएल, कामगार झोपडपट्टी, आंबेडकर प्रभागात जवळपास १५० घरे कोसळल्याने मोठे नुकसान झाले. भानापेठ वॉर्डातील संताजी सभागृहासमोर राजेश चिंतावार यांचे अध्रे घर जमिनीत गेल्याने कोसळले, तर पागलबाबानगरात सर्वदूर पाणी साचल्याने पुरात अडकून पडलेल्या पागलबाबा महाराजाला बोटीच्या माध्यमातून पुरातून बाहेर काढण्यात आले. श्री टॉकीजजवळील काँग्रेस सेवादललगत दोन मोठी झाडे कोसळली, तर गोल बाजारात पाणी साचल्याने कपडा व किराणा दुकानदारांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. यापूर्वीच्या अतिवृष्टीच्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण होण्यापूर्वीच पुन्हा अतिवृष्टी झाल्याने जिल्हा व मनपा प्रशासनातील अधिकारी चिंताग्रस्त आहेत. आजच्या अतिवृष्टीने घरे कोसळण्यास सुरुवात होताच मनपा आयुक्त प्रकाश बोखड व जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर पहाटे पाच वाजल्यापासून भ्रमणध्वनीवरून बचाव पथक व नागरिकांच्या संपर्कात आहेत. बल्लारपूर बायपासवर अष्टभुजा मंदिरासमोरील पुलावर पाणी असल्याने बल्लारपूर मार्ग काही तासांसाठी व हैदराबाद, आदिलाबाद व भोयेगाव मार्गही बंद झाला आहे.
तसेच चांदाफोर्ट चंद्रपूर-गोंदिया या मार्गावरील रेल्वे लाइन वाहून गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. आज सकाळी ही गाडी चंद्रपूर रेल्वे स्थानकावरून गोंदियाच्या दिशेने रेल्वे निघाली. परंतु, पंधरा ते वीस किलोमीटर जात नाही तोच रूळ वाहून गेल्याचे चालकाच्या निदर्शनास येताच गाडी माघारी आली. गोंदिया येथून येणारी रेल्वे मूलपर्यंत येत आहे. जवळपास वीस मीटपर्यंतची लाइन वाहून गेल्याची माहिती चांदाफोर्ट रेल्वे स्थानकातील अधिकाऱ्यांनी दिली. नागपूर रेल्वे विभागातून एक विशेष पथक आले असून दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आज सायंकाळपर्यंत काम पूर्ण झाल्यानंतर उद्यापासून हा मार्ग सुरळीत सुरू होईल, अशीही माहिती रेल्वे विभागाने ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली. मात्र, यामुळे रेल्वे प्रशासनाचे लाखोंचे नुकसान झाले आहे.
शहरातील भूमिगत नाला पूर्णत: निकामी झाल्याने सर्व पाणी रस्त्यांवर साचत असल्याने शहरवासीयांना हा नेहमीचा त्रास झाला आहे. सर्वच रस्त्यांवर पाणी साचल्याने भारतीय स्टेट बँक, नोकिया शोरूम, मुख्य मार्गावरील दुकानदारांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. भूमिगत व्यापार संकुलाला तर जलतरण तलावाचे स्वरूप आले आहे. तिकडे इरई धरण तुडुंब भरल्याने दोन दरवाजे अध्र्या मीटरने उघडण्यात आले आहेत. अशीच परिस्थिती राहिली तर शहरात चौथ्यांदा पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.