नागपूर विभागात गेल्या चोवीस तासात संततधार पावसामुळे ४४ तालुक्यांत अतिवृष्टी झाली. संततधार पावसाने गोसीखुर्द, पुजारीटोला, कालीसरार, लाल नाला, नांद व पोथरा धरणात पाणी वाढल्याने धरणांचे सर्वच दरवाजे उघडावे लागले असून गडचिरोली, भंडारा व गोंदिया जिल्ह्य़ातील नद्यांना पूर आलेला आहे.
मध्य प्रदेश, छत्तीसगडसह विदर्भाच्या पूर्व सीमेवर दमदार पाऊस पडत आहे. सर्वाधिक पावसाची नोंद वर्धा जिल्ह्य़ात २००.१० मिमी एवढी झाली. आष्टी तालुक्यात २०० मिमी, आर्वी तालुक्यात १९६ मिमी, कारंजा तालुक्यात १८४.७० मिमी, देवळी तालुक्यात १३१ मिमी, समुद्रपूर तालुक्यात १२७ मिमी, हिंगणघाट ११४.४० मिमी तर सेलीू तालुक्यात सर्वात कमी ७.८ मिमी झाली. नागपूर जिल्ह्य़ातील १४ तालुक्यांत अतिवृष्टी झाली. नरखेड तालुक्यात सर्वाधिक १५६.२० मिमी झाली. रामटेक तालुका १५५ मिमी, कामठी तालुका १४२ मिमी, नागपूर शहरात १४०.१० मिमी, नागपूर तालुका १४०.१० मिमी, उमरेड तालुक्यात १३५.१० मिमी, काटोल तालुक्यात १३३.४० मिमी, कुही तालुक्यात १२८.४० मिमी, पारशिवनी तालुक्यात १२८ मिमी, सावनेर तालुक्यात १२३.६० मिमी, मौदा तालुक्यात १२१.४० मिमी, हिंगणा तालुक्यात १२०.३० मिमी, भिवापूर तालुक्यात १०७ मिमी, कळमेश्वर तालुक्यात १०३ मिमी पावसाची नोंद झाली.  
मध्य प्रदेश व महाराष्ट्राला जोडणारा रजेगाव येथील वाघ नदीवरील पूल पाण्याखाली गेला. त्यामुळे वाहतूक ठप्प पडली. गोंदिया जिल्ह्य़ातील देवरी तालुक्यात १७० मिमी, सालेकसा तालुक्यात १५५.६० मिमी, आमगाव १४७.६०, सडकअर्जुनी १२३.५० मिमी, गोरेगाव १४४.५० मिमी, तिरोडा १६८ मिमी, अर्जुनी मोर १२३.४० मिमी, भंडारा जिल्ह्य़ातील साकोली तालुक्यात ११३.२० मिमी, लाखनी तालुक्यात १७६.८० मिमी, तुमसर तालुक्यात १४२.६० मिमी, मोहाडी तालुक्यात ११६.५० मिमी, लाखांदूर तालुक्यात १११ मिमी, भंडारा १२३.२० मिमी, पवनी तालुक्यात १३५ मिमी, गडचिरोली जिल्ह्य़ातील कोरची तालुक्यात १४५.४० मिमी, कुरखेडा तालुक्यात १४५ मिमी, वडसा १३२.५० मिमी पाऊस पडला. बुधवारी दिवसभरात नागपूर जिल्ह्य़ात १३०.९७ मिमी, वर्धा १५३.९० मिमी, भंडारा १३१.१९ मिमी, गोंदिया १४७.९९ मिमी, चंद्रपूर ४०.५६ मिमी, गडचिरोली जिल्ह्य़ात ५२.५० मिमी तसेच संपूर्ण पूर्व विदर्भात (नागपूर महसूल विभाग) सरासरी १०९.५२ मिमी पाऊस पडला.
भंडारा जिल्ह्य़ात वैनगंगेला पूर आला आहे. परिणामी पवनी, चंद्रपूर, गडचिरोली या परिसरातील सर्व नद्या तुडुंब झाल्या आहेत. धरणांच्या बुडत क्षेत्रातील गावांना फटका बसू नये यासाठी धरणाचा जलस्तर २३८.८०० मीटरवर स्थिर ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न केला जात असल्याचे, प्रशासनाने सांगितले. पर्लकोटा नदीचे पाणी भामरागडमध्ये शिरले. कोरची, अहेरी, एटापल्ली, सिरोंचा, भामरागड परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. कठाणी, पाल, वैनगंगा, खरबाडी व इतर नद्या दुथडी भरून वाहत आहेत.      
पावसाचा जोर व तुडुंब पाण्यामुळे धरणे भरू लागली आहेत. तोतलाडोह प्रकल्पात ४३३ दलघमी तर नागपूर विभागातील सोळा मोठय़ा प्रकल्पात १ हजार ६५३ दलघमी, तेरा मध्यम प्रकल्पात ११४.१९ दलघमी पाणीसाठा झाला आहे. प्रशासनाला अखेर गोसीखुर्द धरणाचे सर्व ३३ दरवाजे अध्र्या मीटरने उघडावे लागले. गोंदिया जिल्ह्य़ातील कारीसरार धरणाचे चार, पुजारीटोला धरणाचे सात, वर्धा जिल्ह्य़ातील लाल नाला धरणाचे पाच, नांद धरणाचे दोन व पोथरा धरणाचे दोन दारे उघडण्यात आली आहेत.  मध्य प्रदेश व छत्तीसगडमध्येही जोरदार पाऊस सुरू असून परिणामी तेथील नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे त्या परिसरातील रस्ते वाहतूक ठप्प पडली आहे. गडचिरोली जिल्ह्य़ातील पर्लकोटा नदीला पूर आल्याने दीडशे गावांचा संपर्क तुटला आहे. भमरागड येथील पर्लकोटा नदीच्या पुलावर साडेसात फुट पाणी वाहत होते. आलापल्ली- भामरागड, गोंदिया-बालाघाट हे रस्ते बंद पडले आहेत. गोसीखुर्द धरणातून त्यामुळे प्रति सेकंद १लाख ५ हजार घनमीटर पाण्याचा विसर्ग होत आहे. नांद प्रकल्पातून ३१५, शिरपूर प्रकल्पातून २७४, पुजारीटोला प्रकल्पातून ८२९, कालीसरार प्रकल्पातून ६६, पोथरा प्रकल्पातून १८२, गोसीखुर्दमधून ११ हजार ६१६, बघेडा प्रकल्पातून १.९०५, कालपाथरी प्रकल्पातून १०४.१, लाल नाला प्रकल्पातून ६५.९९, चारगाव प्रकल्पातून ३३.०५, लभानसराड प्रकल्पातून ८३.२८ क्युसेक्स विसर्ग होत आहे.
वैनगंगा नदीच्या भंडारा कारधा पुलावरून ९ हजार ९२०, देवरी पुलावरून ५ हजार ९७५, वाघुलीबुटी पुलावरून ९ हजार २६०, वडसा पुलावरून ८ हजार ७२२, कन्हान नदीवरील माथनी पुलावरून २ हजार ८५०, बावनथडी नदीवरील महालगाव पुलावरून १ हजार ५८९, वेणा नदीवरील हिंगणघाट पुलावरून १ हजार ३४५ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होत असल्याची माहिती प्रशासनाने दिली.