उरण-पनवेल राज्य महामार्गावरील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या जासई नाका व गव्हाण फाटय़ावर दररोज वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. सातत्याने होणाऱ्या या कोंडीमुळे या मार्गावरील चाकरमानी, विद्यार्थी तसेच नियमित प्रवासी हैराण झाले आहेत. दोन्ही फाटय़ावर वाहतूक नियंत्रण होत नसल्याने तसेच वाहनचालकांच्या बेशिस्तीचाही फटका या कोंडीस कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत.दररोज सकाळी जाताना तसेच कामावरून सुटल्यावर  गव्हाणफाटा व जासई येथील अवघ्या अध्र्या तासाच्या प्रवासासाठी दररोज तीन ते चार तासांचा वेळ खर्च करावा लागत आहे.राष्ट्रीय महामार्ग ४ ब वरून चिरनेर परिसरातून येणाऱ्या जड वाहनांमुळे तसेच पनवेलकडे जाणाऱ्या वाहनांना गव्हाण रेल्वे पुलावर होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे गव्हाण फाटय़ावरील वाहतुकीवर परिणाम होत आहे. सर्वानाच या बेशिस्तीचा फटका बसत आहे. या सर्वात जास्त त्रास सायंकाळी कामावरून घरी परतणाऱ्या चाकरमान्यांना होतो. ही दररोजचीच डोकेदुखी ठरली असल्याची समस्या ठरली आहे, असे अमित पाटील यांनी सांगितले आहे. वाहतूक नियंत्रण करण्यासाठी खास यंत्रणा राबवून प्रवाशांची होणारी ही समस्या दूर करावी, अशी मागणी उरण प्रवासी संघटनेचे अध्यक्ष मनोज ठाकूर यांनी वाहतूक विभागाकडे केली आहे.