नवी मुंबई शहरातील ऐरोली, घणसोली, कोपरखरणे आदी ठिकाणी अंतर्गत असणाऱ्या रस्त्यावर अवजड वाहनांना बंदी असतानाही वाहतूक सर्रासपणे सुरूच असल्यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. शहरातील अंतर्गत रस्त्यावर वाहतूक कोंडी आणि अपघाताला ही अवजड वाहने कारणीभूत ठरत आहे. वाहतूक पोलिसांकडून  कारवाई थंडवल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
ठाणे-बेलापूर मार्गावरून अवजड वाहनांना वाहतुकीसाठी पर्याय खुला करून दिला आहे. मात्र असे असताना शहरातील अंतर्गत रस्त्यावर अवजड वाहनांची घुसखोरी सुरू आहे. पोलिसांचा वचक न राहिल्याने अवजड वाहने बिनधास्त ये-जा करीत आहेत. ठाणे-बेलापूर मार्गावर पोलिसांच्या कचाटय़ातून सुटण्यासाठी वाहनचालकांनी अंतर्गत रस्त्याचा वापर सुरू केला आहे. मनमानी आणि बेतालपणे वाहनचालक गाडी चालवत असल्याने वाहतुकीच्या खोळंब्यासह शालेय विद्यार्थी आणि नागरिकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे.
अवजड वाहनांना रोखण्याऐवजी पोलीस मात्र बघ्याची भूमिका घेतात. अवजड वाहतूक रोखणे तर लांबच, पण साधा दंडही आकारला जात नाही. शहरातील अंतर्गत रस्त्यावरून जाणारी अवजड वाहने हे भरधाव ये-जा करतात. मागील वर्षी ऐरोली सेक्टर तीन परिसरामध्ये अंतर्गत रस्त्यावर महाविद्यालयीन युवतीला एका अपघातात जीव गमवावा लागला होता. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी अवजड वाहनांना गावठणातील रस्त्यावरून मज्जाव केला होता. मात्र अवघ्या काही महिन्यांतच पोलिसांची मोहीम थंडावल्यांनतर या ठिकाणी वाहनांची वर्दळ सुरू झाली आहे. ऐरोली परिसरातील अनेक महाविद्यालयांच्या शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक त्याचबरोबर रुग्णवाहिकेची आणि दुचाकी आणि रिक्षाचालकांची ये-जा या मार्गावरून होत असते. मात्र अवजड वाहनामुळे वाहनचालकांना नाहक त्रास सोसावा लागत आहे. वाहतूक पोलीस एखाद्या अपघाताची वाट पाहात आहे का? असा जळजळीत सवाल पालकांनी केला आहे. या संदर्भात रबाले वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब गाडे यांच्याशी संपर्क साधला असता अवजड वाहने अंतर्गत रस्त्यावर येत असल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.