सध्या लग्नसराई जोरात सुरू असून लग्नांवर दौलतजादा करण्याचीही स्पर्धा लागलेली आहे. यामध्ये लग्नाच्या वरातीसाठी पूर्वीच्या काळी घोडा, टांगा तर सध्या बहुतांशी वाहन वापरले जाते. यासाठी किमान पाच ते दहा लाख रुपये खर्च येत असल्याची माहिती लग्नासाठी हेलिकॉप्टर वापरणाऱ्या नवरदेवाने दिली आहे. मात्र सध्या लग्नातील दौलतजादा करण्याची स्पर्धा लागलेली असल्याने तासासाठी लाखो रुपये मोजून आपल्याकडे जनतेचे लक्ष वेधून घेण्यासाठी हेलिकॉप्टर भाडय़ाने घेऊन नवऱ्याची वरात काढली जात आहे. लग्नातील खर्चात कपात व्हावी याकरिता डोंबिवलीमधील ज्येष्ठ नागरिक तसेच उरण मधील तरुण पुढे सरसावले आहेत. साध्या पध्दतीने लग्न करून समाजापुढे आदर्श निर्माण करावा असा यामागील उद्देश आहे. मात्र उरण-पनवेल परिसरात सध्या साडेबारा टक्केचे तसेच शेतीच्या विक्रीतून करोडो रुपये आलेले आहेत. या पैशातून लग्नात आलिशान शामियाने उभारून तसेच नवरा-नवरीला महागडे कपडे- आभूषणे आणून त्याचप्रमाणे कॅटर्स नेमून हजारोंच्या जेवणावळी आणि गळा ओला करण्यासाठी परदेशी मद्य आदीचाही वापर केला जात आहे. याच्याच जोडीला आता शेजारील गावातच लग्नासाठी जाण्याकरिता हेलिकॉप्टर भाडय़ाने घेऊन नवऱ्याची वरात काढली जात आहे. त्यासाठी खास हेलिपॅड तयार करण्यासाठीही हजारो रुपये खर्च केले जात आहेत. नवरा लग्नासाठी हेलिकॉप्टरने येत असल्याने नवऱ्यापेक्षा कुतूहलाने हेलिकॉप्टर पाहण्यासाठी गावकऱ्यांची गर्दीच अधिक होत असली तरी केवळ दौलतजादा करण्यासाठीचा हा खटाटोप असल्याचे जाणकारांचे मत आहे.