गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना येत्या तीन दिवसांत नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करून ही मागणी पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा आमदार चंद्रशेखर बावणकुळे यांनी दिला आहे.
नागपूर जिल्ह्य़ात ५० टक्क्यांच्या आत १३ तालुक्यांत जवळपास ३२ हजार २०३.१३ हेक्टर क्षेत्र बाधित झाले, तर ५० टक्क्यांच्यावर १ लाख ०६ हजार ५४३.९५ हेक्टरवरील नुकसान झाले. यामध्ये संत्रा, मोसंबी, गहू, हरभरा, भाजीपाला व इतर पिकांचा समावेश आहे. आधीच कर्जबाजारी असलेल्या व शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांचे या अस्मानी संकटामुळे आणखी कंबरडे मोडले आहे. सर्वाधिक नुकसान कामठी विधानसभा मतदारसंघातील कामठी आणि मौदा तालुक्यांमध्ये झाले आहे. कामठी तालुक्यात ५० टक्क्यांच्या वर १४ हजार ८२३.०६ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. मौदा तालुक्यात १४ हजार ८९७.०० हेक्टर क्षेत्र बाधित झाले. हे नुकसान भरून काढण्यासाठी जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांना १५५ कोटी ९८ लाख ४९ हजार रुपये मदत करावी, अशी मागणी जिल्हाधिकारी, जिल्हा कृषी अधीक्षक, विभागीय आयुक्तांच्या कार्यालयातर्फे शासनाकडे करण्यात आली होती.
शासनाने जिल्ह्य़ासाठी फक्त ६६ कोटी रुपये देऊन शेतकऱ्यांची बोळवण केली. कामठीसाठी २० कोटी ७४ लाख रुपये, नागपूर ग्रामीणसाठी २ कोटी १३ लाख रुपये देण्याची मागणी करण्यात आली होती. अत्यल्प रक्कम मिळाल्याने जिल्ह्य़ातील नुकसानग्रस्त १ लाख ५० हजार १२२ शेतकऱ्यांपैकी फक्त ३९ हजार २१८ शेतकऱ्यांना मदत करण्यात आली. त्यापैकी फक्त ४ हजार ६२८ शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झाली आहे. शासनाने दिलेल्या अत्यल्प मदतीमुळे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहे. अतोनात नुकसान होऊनही मदत वेळेवर न मिळाल्याने शेतकऱ्यांवर पुन्हा अन्याय केला आहे. यामुळे शेतकरी हवालदिल होऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त होत असल्याचेही बावणकुळे यांनी शासनाचे लक्ष वेधले आहे.
शासनाने जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांना तीन दिवसात उर्वरित ८९ कोटी रुपये त्वरित उपलब्ध करून द्यावे. तसेच कामठी, मौदा व नागपूर ग्रामीणमध्ये देय असलेले ४२ कोटी रुपये पुढील सात दिवसांत उपलब्ध करून द्यावे. अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असेही बावणकुळे यांनी म्हटले आहे.