*  ३ डिसेंबर – डोंबिवली
तरुणीची छेडछाड रोखण्याच्या प्रयत्न करणाऱ्या संतोष विच्छिव्होरा या युवकाची टोळक्याकडून हत्या
* ६ डिसेंबर  – ठाणे
सततच्या छेडछाडीला  कंटाळून विक्रमगड तालुक्यातील ९ वीतील मुलीची आत्महत्या.
*  ११ डिसेंबर  – कांदिवली
विवाहितेवर घरात घुसून कीटकनाशक टाकून जाळण्याचा प्रयत्न. या महिलेने छेडछाड करणाऱ्या आरोपीची पतीकडे तक्रार केली होती. पतीने त्याला मारहाण केल्याने बदला घेण्यासाठी त्याने हा हल्ला केला.
*  १० डिसेंबर – डोंबिवली
लोढा हेवन येथे राहणाऱ्या डॉ. ओमप्रकाश मिश्रा या डॉक्टरकडून गृहिणीचा विनयभंग
*  ११ डिसेंबर – डोंबिवली
चार रस्ता भागात २२ वर्षीय तरुणीचा भररस्त्यात विनयभंग. लोकांची बघ्याची भूमिका
*  डिसेंबर २०१२ – अमृतसर
आपल्या मुलीची छेडछाड रोखण्यासाठी गेलेल्या रवींद्र पाल या सहाय्यक पोलीस निरीक्षकाची गुंडांकडून गोळी घालून हत्या
*  १० नोव्हेंबर २०१२ मध्यप्रदेश
मध्यप्रदेशातील रानी नावाच्या २८ वर्षीय तरुणीची छेडछाडीला कंटाळून आत्महत्या.

देशातील एकाच महिन्यातील मुलींच्या छेडछाडीच्या या अगदी थोडय़ा घटना. ही यादी अर्थातच खूप मोठी आहे. या घटनांचा आलेख झपाटय़ाने वाढतो आहे. ‘नॅशनल रेकॉर्ड ब्युरो ऑफ क्रोइम’च्या ताज्या आकडेवारीत महिलांच्या छेडछाडीच्या गुन्’ाात ५.८ टक्के वाढ झाल्याचे म्हटले आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनीही एका उत्तरात महिलांवरील अत्याचारात वाढ झाल्याची कबुली दिली आहे.

*  डिफेन्स अगेन्स रेप अ‍ॅण्ड इव्हटिझर्स या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार भारतात..
दर २६ मिनिटाला १ महिलेचा विनयभंग होतो
दर ३४ मिनिटांनी १ महिलेवर बलात्कार होतो
दर ४२ मिनिटांनी १ महिलेचा लैंगिक छळ होतो
दर ४३ मिनिटाला १ महिलेचे अपहरण होते
दर ९३ मिनिटांनी १ महिलेचे अपहरण होते.

छेडछाड आणि विनयभंग प्रकरणात आरोपींना तात्काळ जामीन मिळतो. हे गुन्हे अजामीनपात्र करा, अशी मागणी वेळोवेळी शासनाकडे केली गेली आहे.
जाने २०१२ ते सप्टें २०१२ या वर्षांत मुंबई रेल्वेत महिलांचा विनयभंग आणि छेडछाडीच्या १३५ प्रकरणे नोंद झाली आहेत. नोंद न झालेले प्रकार यापेक्षा कितीतरी अधिक असतात. पोलीस निरीक्षक राजेंद्र पाल यांनी सांगितले की, महिलांना ट्रेन पकडायची घाई असते. त्यामुळे त्या दुर्लक्ष करून निघून जातात. तर बदनामीपोटीही अनेक जणी तक्रार करीत नाहीत.

लाला लजपतराय महाविद्यालय आणि ‘द पीपल फाऊंडेशन’ या संस्थेने मुलींच्या छेडछाडीचे एक सर्वेक्षण केले. त्यात  ९७ टक्के महाविद्यालयीन तरुणींनी छेडछाड होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. ५७ टक्के छेडछाड बस, टॅक्सी थांबे या ठिकाणी होते. ५२ टक्के छेडछाड गर्दीच्या ठिकाणी होते. ३२ टक्के सहलींच्या ठिकाणी तर १५ टक्के छेडछाड महाविद्यालयात होत असल्याचे दिसून आले.

सर्वच राज्यांना छेडछाडीच्या गुन्हयांची चिंता भेडसावू लागली आहे. मध्यप्रदेश सरकारने याविषयी कडक पावले उचलत छेडछाड करणाऱ्या आरोपींनी सरकारी नोकरी तसेच वाहन परवाना आणि पारपत्र न देण्याचा निर्णय घेतला आहे.

विनयभंगाच्या गुन्हयात लगेच जामीन मिळतो. कोर्टात ते प्रकरण यायला अनेक वर्षे लागतात. न्यायालयात सिद्ध होणेही खूप कठीण असते. पीडित तरुणीचे या काळात लग्न झालेले असते. तिचे घरचे तिला न्यायालयात जाऊ देत नाहीत, परिणामी  आरोपी सुटतो, असे पोलिसांचे म्हणणे आहे.    

महिलांच्या छेडछाडीच्या गुन्ह्यांमध्ये प्रचंड मोठी वाढ झाल्याचे आकडेवारी सांगते आहे आणि ‘जाणवतेही’ आहे. महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे अन्य गुन्ह्यांप्रमाणे नसतात. पुरुषांच्या मनातील महिलांबाबतच्या भावनांचे ते थेट प्रकटीकरण असते. समाजातील महिलांच्या स्थानाचे ते निदर्शक असतात. अशा गुन्ह्यांविरोधात पोलिसी खाक्या तर दाखवावा लागतोच; परंतु ‘पुरुषी मनोवृत्ती’कडेही गांभीर्याने लक्ष द्यावे लागते. ही ‘स्त्रीभोगी’ मनोवृत्ती नष्ट केल्याशिवाय, किमानपक्षी ती आटोक्यात आणल्याशिवाय हे गुन्हे पूर्णपणे थांबणार नाहीत.

पोलिसांचा रुक्षपणा
विनयभंगाच्या प्रकरणात पोलिसांचा आलेला अनुभव एका तरुणीने सांगितला. ‘माझा मित्र मला त्रास देत होता. भररस्त्यात त्याने मला मारहाण करून विनयभंग केला. मी नोव्हेंबर महिन्यात पोलीस उपायुक्तांकडे गेले. त्यांनी फक्त त्याला बोलावून घेतले. गुन्हा दाखल करायचा तर मी राहात असलेल्या स्थानिक पोलीस ठाण्यात जायला सांगितले. पण तिथे सर्व मला ओळखतात. नातेवाइकांमध्ये माझी बदनामी झाली असती. मी खूप विनंती  केली. पण त्यांनी दुसऱ्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होणार नाही, असे सांगितले. मला माघारी फिरावे लागले. माझा विनयभंग करणारा अजून मोकाट आहे.
जिथे आता महिला पोलिसांचा विनयभंग होतो तिथे आम्ही सुरक्षित कशा राहू शकतो, असा सवाल गारोडिया इंटरनॅशनल शाळेतल्या महालक्ष्मी आनंद या शिक्षिकेने केला.