जिल्हा परिषदेतील निलंबित शिक्षिका रजनी भोसले यांच्या गैरवर्तवणुकी विरोधात पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांनी सुरू केलेला एल्गार सलग तिसऱ्या दिवशी सुरू ठेवला. कार्यालयात पोलीस संरक्षण दिले जात नसल्याने शुक्रवारी कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलन कायम ठेवले. दरम्यान, या संपूर्ण घडामोडीत जिल्हा परिषद प्रशासन आणि पोलीस विभाग परस्परांकडे बोट दाखवत असल्याने अद्याप भोसले यांच्या विरूध्द कोणतीही कारवाई झाली नसल्याची आंदोलकांची भावना आहे.
शिलापूर येथील जिल्हा परिषद शाळेच्या निलंबित शिक्षिका रजनी भोसले यांनी २५ मार्च रोजी नाशिक पंचायत समिती कार्यालयात दिवसभर गोंधळ घातला. महिला कर्मचारी व अधिकाऱ्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. तेव्हापासून कर्मचाऱ्यांनी सुरू केलेले लेखणी बंद आंदोलन अद्याप सुरू आहे. भोसले यांचे मुख्यालय निफाड येथे असतांना नाशिक पंचायत समितीच्या आवारात येऊन येथील अधिकारी, कर्मचाऱ्यांशी त्यांचे सतत वाद झाले. कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करणे, दादागिरी करणे, धमकी देणे, शासकीय कामकाजात अडथळा आणणे आदी प्रकार अव्याहतपणे त्यांच्याकडून सुरू असल्याची तक्रार आहे. त्यांच्या वागणुकीमुळे पंचायत समितीमधील अधिकारी व कर्मचारी हतबल झाले आहेत. त्यामुळे कामकाज करण्याची मानसिकता राहिली नसुन कोणत्याही क्षणी कर्मचाऱ्यांच्या भावनांचा उद्रेक होऊ शकतो असा इशारा संबंधितांनी दिला आहे. भोसले यांचे वर्तन लक्षात घेऊन त्यांच्या विरूध्द तात्काळ प्रतिबंधात्मक कारवाई करावी, कार्यालयात पोलीस संरक्षण द्यावे, अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. या बाबत जिल्हा परिषद आणि पोलीस यांच्यात चर्चा सुरू असली तरी दोन्हींकडून दिशाभूल करण्यात येत असल्याची तक्रार कर्मचाऱ्यांनी केली. वास्तविक निलंबित भोसले यांची कार्यशैली घेऊन जिल्हा परिषद त्यांना बडतर्फ तर पोलीस सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी कारवाई करू शकते. मात्र दोन्ही विभागांचा सुरू असलेल्या चालढकलीमुळे शासकीय कामांत अडथळे निर्माण झाल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे.