उरण तालुक्यातील डोंगरी पाणजे परिसरातील जेएनपीटीच्या परिसरात जखमी अवस्थेत आढळलेल्या दोन फ्लेमिंगोंपैकी एकाचा मृत्यू झाला असून पक्षिमित्रांकडून या घटनेबाबत हळहळ व्यक्त केली जात आहे. जेएनपीटीच्या अतिउच्च दाबाच्या टॉवरच्या विजेच्या तारांचा धक्क्य़ाने हे फ्लेमिंगो जखमी होत असल्याची बाब समोर आली असून त्यामुळे फ्लेमिंगोंच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आले.
हजारो मैलांचा प्रवास करून मुंबई, नवी मुंबई तसेच उरण परिसरात शंभरपेक्षा अधिक जातींचे परदेशी पक्षी येत असतात. उरण तालुक्यातील डोंगरी व पाणजे परिसरातील खाडीत फ्लेमिंगोंचे खाद्य असलेला रेपा (लहान कोळींब) मिळत असल्याने ऑक्टोबरमध्ये आलेले हे पक्षी जूनपर्यंत वास्तव्य करतात. त्यामुळे या परिसरात सुट्टीच्या दिवशी पक्षीप्रेमीसुद्धा मोठय़ा संख्येने येत आहेत. या परिसरात हजारोच्या संख्येने येणाऱ्या या परदेशी पाहुण्यांची म्हणजेच फ्लेमिंगोंची शिकार झाल्याच्या घटना घडल्या आहेत.  अनेक ठिकाणी या पक्ष्यांचे अवशेष आढळून आले आहेत. त्यामुळे या पक्ष्यांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे.
१४ जानेवारीला उरण तालुक्यातील डोंगरी पाणजे परिसरातील जेएनपीटीच्या अतिउच्च दाबाच्या टॉवरच्या विजेच्या तारांचा धक्का लागून दोन फ्लेमिंगो जखमी झाले होते. त्यांच्यावर वन विभाग तसेच पक्षीप्रेमींनी उपचार करून त्यांना सोडल्यानंतर पुन्हा एकदा याच परिसरात दोन फ्लेमिंगो जखमी अवस्थेत सापडले होते. त्यापैकी एका फ्लेमिंगोचा मृत्यू झाल्याची माहिती उरण वनसंरक्षक अधिकाऱ्यांनी दिली आहे तर दुसऱ्या फ्लेमिंगोवर उपचार करून त्याला सोडण्यात आले आहे. फ्लेमिंगो येथील उच्च दाबाच्या विजेच्या तारांचा धक्का लागून जखमी होत असल्याचेही वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट करून याबाबत चिंता व्यक्त केली आहे. पक्ष्यांच्या सुरक्षेसाठी वनपालांची नेमणूक करण्यात आली असून परिसरावर वन विभाग लक्ष ठेवून असल्याचे त्यांनी सांगितले. या परदेशी पक्ष्यांच्या संरक्षणाची उपाययोजना आखण्याची मागणी चिरनेर येथील पक्षीप्रेमी जयवंत ठाकूर यांनी केली आहे.