सिंहस्थानिमित्त कन्नमवार पूल ते लक्ष्मीनारायण मंदिर या दरम्यान गोदावरी नदीवर नव्याने बांधण्यात येणाऱ्या घाट परिसरातून मार्गस्थ होणाऱ्या उच्चदाब वाहिन्या स्थलांतरीत करण्यास हिरवा कंदील दाखविण्यात आला आहे. या उच्चदाब वाहिन्यांमुळे परिसराची अपघाताची शक्यता वर्तविली जात होती. तसेच भाविकांना मार्गक्रमण करताना खांब अडसर ठरणार होते. यामुळे चार कोटी १४ लाख रुपये खर्चुन या उच्च दाब वाहिन्यांचे स्थलांतर केले जाणार आहे.
आगामी सिंहस्थात मध्यवस्तीतील रामकुंड व लगतच्या गोदावरी काठावर भाविकांची गर्दी होऊन कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी खालील भागात नव्याने सात घाट बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्या अंतर्गत टाळकुटेश्वर पूल ते कन्नमवार पूल उजव्या तिरावर, कन्नमवार पूलाच्या निम्न बाजुस उजव्या तिरावर, लक्ष्मीनारायण पुलाच्या उध्र्व बाजुला उजव्या तिरावर, लक्ष्मीनारायण पूल ते कपीला संगण डाव्या तिरावर, टाकळी परिसरात नासर्डी गोदावरीच्या संगमावर उजव्या तिरावर, दसक पंचक परिसरात जर्नादन स्वामी पुलाच्या उजव्या तिरावर आणि डाव्या तिरावर घाट बांधण्याचे काम प्रगतीपथावर आहे. कन्नमवार पूल ते लक्ष्मी नारायण मंदिरादरम्यान ज्या ठिकाणी हे नवीन घाट बांधले जात आहे, त्याच परिसरातुन वीज कंपनीच्या दोन उच्च दाब वाहिन्या मार्गस्थ होतात. या पाश्र्वभूमीवर, उच्च दाब वाहिन्या स्थलांतरीत करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला. या कामासाठी सुमारे सव्वा चार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यास उच्चाधिकार समितीच्या बैठकीत मान्यता मिळाली असली तरी प्रशासकीय मान्यता देऊन लाभक्षेत्र विकास प्राधिकरणकडून निधी उपलब्ध होणे आवश्यक होते. नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत हा निधी उपलब्ध करून देण्याची सूचना संबंधित विभागाला करण्यात आली. सिंहस्थाला आता केवळ काही दिवसांचा कालावधी बाकी आहे. विहित मुदतीत उच्च दाब वाहिन्यांचे स्थलांतरण होणे आवश्यक आहे. यामुळे शक्य तितक्या लवकर हे काम पूर्ण करावे, असे महावितरणला सूचित करण्यात आले आहे.