येथून जवळच असलेल्या पानेवाडीच्या हिंदुस्तान पेट्रोलियम प्रकल्प व्यवस्थापनाच्या मनमानी कारभाराच्या विरोधात शुक्रवारपासून टँकरचालकांनी कामबंद आंदोलन सुरू केल्यामुळे या डेपोतून उत्तर महाराष्ट्रात होणारी इंधन वितरण व्यवस्था कोलमडली आहे.
कंपनी प्रशासनाने सकाळी सहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत इंधनाचे टँकर भरून द्यावेत, अशी चालकांची मागणी आहे. रात्रीच्या वेळी होणाऱ्या अपघातांमुळे आतापर्यंत चार ते पाच चालकांना प्राण गमवावे लागले आहेत. चाळीसगाव येथून इंधन टँकर खाली करून आलेला चालक सखाराम दगा भोसले याला कंपनीच्या अधिकाऱ्यांनी बळजबरीने रात्रीच्या वेळी पुन्हा टँकर भरण्यास भाग पाडले. पण, कौळाणे ते मालेगाव दरम्यान या टँकरचा अपघात झाला. त्यात चालक भोसले यांचा मृत्यू होऊन क्लिनरची प्रकृती चिंताजनक आहे. ही बाब सर्व टँकरचालक आणि क्लिनरला समजल्यानंतर सर्व जण कंपनीच्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यास गेले. त्यावेळी अधिकाऱ्यांनी अशा घटना होत राहतात, याचा आम्हाला काही फरक पडत नाही असे बेजबाबदारपणे उत्तर दिले. यामुळे संतप्त झालेल्या चालक व क्लिनर यांनी कारखान्याच्या प्रवेशद्वारासमोर जोरदार घोषणाबाजी करत कामबंद आंदोलन सुरू केले. जोपर्यंत व्यवस्थापन आपल्या धोरणात बदल करत नाही, तोपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतल्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील इंधन वितरण व्यवस्था कोलमडली आहे. कंपनीने रात्रीच्या वेळी टँकर भरणे बंद करावे ही आंदोलकांची मुख्य मागणी आहे. जोपर्यंत कंपनीचे अधिकारी मनमानी व स्वताचे निर्णय लादण्याचे प्रकार थांबवत नाहीत, तोपर्यंत इंधन पुरवठय़ाचे काम केले जाणार नसल्याचे नंदु चौधरी, कल्याण मगर, समाधान शिंदे आदींनी सांगितले. या आंदोलनामुळे नाशिक, धुळे, जळगाव व नंदुरबार या चार जिल्ह्यात इंधन वितरण बंद झाल्यामुळे कारखाना व्यवस्थापन अडचणीत आले आहे.