रंगपंचमीचा सण अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने नवी मुंबईतील बाजारपेठांमध्ये पर्यावरण पूरक रंग, विविध चिनी बनावटीच्या आकर्षक पिचकाऱ्या दाखल झाल्या आहेत. रंगपंचमीचे वेध बच्चे कंपनीला लागले असून विविध आकर्षक पिचकाऱ्यांची खरेदी करण्यासाठी बाजारात त्यांची रेलचेल सुरू झाली आहे. बाजारपेठेत दाखल झालेल्या विविध आकर्षक रंगीत आणि रूपात आलेल्या चिनी बनावटीच्या पिचकाऱ्या लहान मुलांना भुरळ पाडत आहेत. तर यंदा कार्टून्स पिचकाऱ्यांची चलती असून आपल्या आवडत्या कार्टूनची पिचकारी घेण्याकडे बालकांचा कल दिसून येत आहे. तर हॉलीवूड पटावरील पोस्टर्स, छोटा भीम, हनुमान, तसेच सिनेकलाकारांचे फोटो असलेल्या पिचकाऱ्या दाखल झाल्या आहेत. भारतीय बनावटीच्या पिचकाऱ्यांना चायनामेडने मागे टाकल्याचे चित्र येथे दिसत आहे. शहरातील बाजारपेठा होळी व रंगपंचमीच्या स्वागतासाठी सजल्या असून एकीकडे महागाई वाढत असली तरीदेखील ग्राहकांची खरेदीसाठी उडालेली झुंबड पाहता सणावर महागाईचा काहीही परिणाम नसल्याचे दिसून येत आहे. शहरातील दुकानदारांनी रंगपंचमीच्या सणाची जय्यत तयारी सुरूकेली आहे. रंगामुळे त्वचेला इजा पोहोचू नये, निसर्गाचा समतोल बिघडू नये, म्हणून पर्यावरणपूरक रंग विक्रीसाठी ठेवले आहेत. त्या रंगांना ग्राहकांकडूनही मोठय़ा प्रमाणात मागणी आहे. रंगांच्या किमती वाढल्या

चिनी बनावटीच्या पिचकाऱ्यांची मोठी विक्री
रंगांच्या किमती यंदा ५ ते १० टक्क्यांनी वाढले असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे कलर स्प्रे, हर्बल गुलाल, हर्बल लिक्विड, मॅजिक कलर, कॅप्सूल यांसारखे नवीन प्रकार बाजारात विक्रीस उपलब्ध झाले आहेत. रंगांची उधळण करण्यासाठी विविध आकाराच्या चिनी बनावटीच्या पिचकाऱ्याही मोठय़ा प्रमाणात विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये एअर ब्लास्टर, वॉटरगन, बिग मिशेल, वॉटर फिल्टर, हॅपी समर आदी पिचकाऱ्यांचा समावेश आहे. लहान पिचकाऱ्यांची किंमत ३० रुपयांपासून १५० रुपयांपर्यंत आहे तर काटरूनच्या पिचकाऱ्या म्हणजे छोटा भीम, हनुमान, बालगणेश, डॉरीमॉन, स्पायडर मॅन, सिने कलावंत २०० ते ३०० रुपयांपर्यंत बाजारपेठांमध्ये उपलब्ध आहेत. मोठय़ा आकाराच्या पिचकाऱ्या ५०० ते १००० रुपये असून बच्चे कंपनीचा कल खरेदी करण्याकडे आहे.