सलग चार दिवस सुट्टय़ा म्हटले की सहलीच्या योजना आखल्या जातात. ऑक्टोबरच्या पहिल्याच आठवडय़ात (२ ते ५) नोकरदारांना ही पर्वणी मिळणार आहे. मात्र, त्यांना या सलग सुट्टय़ांच्या चौकाराचा काहीच लाभ होणार नाही. याचे कारण म्हणजे त्याच्या पुढच्याच आठवडय़ात आलेल्या शाळांच्या सहामाही परीक्षा आणि विधानसभा निवडणुका.
२ ते ५ ऑक्टोबरदरम्यान सुट्टय़ा असल्याने सरकारी कर्मचारी आणि कॉर्पोरट जगतात या सुट्टय़ांचा आनंद कसा उपभोगायचा यावर खमंग चर्चा रंगू लागल्या आहेत. परंतु, त्यानंतर लगेचच येणाऱ्या शाळांच्या परीक्षांमुळे अनेकांच्या विशेषत: पालकवर्गाला या चर्चेवर पाणी सोडावे लागण्याची शक्यता आहे. कारण सुट्टय़ा असल्या तरी पिछाडीवर राहिलेला अभ्यासक्रम पूर्ण करून घेत विद्यार्थ्यांकडून त्याची उजळणी करून घेणे याकरिता या सुट्टय़ा ‘अनधिकृतपणे’ कारणी लावण्याच्या विचारात काही शाळा आहे.
या वेळेस अनपेक्षितपणे लांबलेली गणेशोत्सवाची सुट्टी तसेच १५ ऑक्टोबरला होणारे विधानसभेसाठीचे मतदान यामुळे शाळांचे अभ्यासक्रमाबरोबरच परीक्षांचे वेळापत्रकही पार कोलमडून गेले आहे. त्यातून बहुतांश शाळांमधील शिक्षकांना निवडणुकीचे काम लागण्याची शक्यता आहे. शाळांना अभ्यासक्रम पूर्ण करणे, उजळणी करून घेणे, परीक्षा घेणे यासाठी हातात असलेल्या दिवसांचे योग्य व काटेकोर नियोजन करणे भाग पडणार आहे.
कारण, त्यानंतर तिसऱ्या आठवडय़ात दिवाळीची सुट्टी सुरू होईल. म्हणून या पाच दिवसांच्या सुट्टीत एखाददोन दिवसांचा अपवाद वगळता शाळा सुरू राहण्याची शक्यता आहे, अशी माहिती ‘महाराष्ट्र मुख्याध्यापक संघटना महामंडळा’चे प्रवक्ता प्रशांत रेडीज यांनी दिली.
प्रचाराचा जोर वाढणार
मुलांचे पालक सुट्टी काळात घरी असल्याने हे चार दिवस निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांकरिता मात्र प्रचाराच्या दृष्टीने सोयीचे ठरले आहेत. अनेकांनी या चार दिवसांच्या संधीचे सोने करण्यासाठी आपली ‘व्होटबँक’ असलेल्या परिसरात प्रचार करण्यावर भर देण्याचा निर्णय घेतला आहे. कारण, ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत निवडणुकीच्या रिंगणात कोणकोण परस्परांसमोर दंड ठोकून उभे राहणार आहे, हे जवळपास निश्चित झालेले असेल. त्यातून या वेळेस प्रचाराकरिता केवळ १६ ते १७ दिवस हाताला लागणार आहेत. त्यामुळे, हे पाच दिवस मतदारांशी घराघरात जाऊन संपर्क साधण्यावर आमचा भर असेल, असे ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेने’च्या पश्चिम उपनगरातील एका वरिष्ठ नेत्याने म्हणणे आहे.