लोकांच्या घरी धुणी-भांडी घासून चरितार्थ चालवणाऱ्या एका मोलकरणीने सापडलेली रक्कम ज्याची होती त्याला परत करून प्रामाणिकपणा जिवंत असल्याचे दाखवून दिले. तिच्या या प्रामाणिकपणाची दखल घेऊन समाजसेविका डॉ. रूपाताई कुळकर्णी व नगरसेवक प्रफुल्ल गुडधे यांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला.
सुलोचना बेले असे त्यांचे नाव असून त्या रामबाग, इमामवाडा परिसरात पडक्या घरात राहते. पती चौकीदार असून नातू सतत आजारी राहते. खरं तर अशा परिस्थितीत ती जो काही पैसा कमवते, त्यात तिचा आणि कुटुंबाचा कसाबसा उदरनिर्वाह होतो. अशा ठिकाणी दुसरा कोणताही व्यक्ती राहिला असता तर सापडलेली रक्कम चक्क घशात घातली असती. परंतु मनाला न पटल्यामुळे तिने ही रक्कम ज्याची होती त्याला परत करण्याचे औदार्य दाखवले. सुलोचना बेले धंतोली परिसरातून जात असताना तिला एक बॅग रस्त्यावर पडलेली दिसली. ती बॅग कुणाची आहे, असे तिने विचारले. परंतु कुणीच प्रतिसाद न दिल्याने ती बॅग घेऊन घरी आली.
ती बॅग उघडली असता त्यात तिला काही रक्कम दिसली. तसेच पॅनकार्ड, एटीएम कार्ड, डेबीट कार्ड, बँकेचे चेकबुक, पासबुक आणि महत्त्वाची कागदपत्रे होती. तिला लिहिता वाचता येत नसल्याने ती घराशेजारी राहणाऱ्या सुधीर रंगारी यांच्याकडे गेली व घडलेला प्रकार कानावर टाकला. त्यांनी बॅगमधील कागदपत्रे बघितली असता ती बॅग सिंचन विभागात ठेकेदार असलेले अभियंता जे.डी. सिंग यांची असल्याचे दिसून आले. तसेच बॅगमध्ये २६ हजार ६०० रुपये असल्याचे लक्षात आले. कागदपत्रावर असलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून त्यांनी सिंग यांना घरी बोलावले व त्यांची बॅग त्यांना परत केली.
दरम्यान, सिंग यांनी बॅग हरवल्याची तक्रार धंतोली पोलीस ठाण्यात केली. तसेच आता बॅग मिळणार नाही, अशी भावना त्यांच्या मनात निर्माण झाल्याने त्यांनी त्याकडे लक्षही दिले नाही. ही बाब शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष बंटी शेळके यांना कळली. त्यांनी बेले यांचा सत्कार करण्याचे ठरवले. रामबागेतीलच डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभवनात सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. मोलकरीण संघटनेच्या अध्यक्षा व समाजसेविका डॉ. रूपाताई कुळकर्णी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी नगरसेवक प्रफुल्ल गुडधे, गोदावरी शेलार, बंटी शेळके प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी रूपाताई म्हणाल्या, घरात चोरी झाली अथवा एखादी वस्तू गहाळ झाली तर मोलकरीणवर आळा घेतला जातो. नोकराविषयी मालकाची मानसिकता संकुचित झाली आहे. परंतु या घटनेने प्रामाणिकपणा जिंवत असल्याचे एका मोलकरणीने दाखवून दिले आहे. या घटनेमुळे मोलकरणीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज असल्याचेही कुळकर्णी म्हणाल्या.
यावेळी जे.डी. सिंग म्हणाले, बॅग मिळणार नाही असा मी विचार करत असतानाच रात्री १० वाजता मोबाईल खणखणला. रंगारी यांनी लगेच रामबाग येथे बोलावले. त्यानुसार रामबाग येथे बेले यांच्या घरी गेलो. घरची परिस्थिती बघितल्यानंतर बॅग सापडल्याचा आनंद झाला नाही, उलट आश्चर्य वाटले. पैशाची आवश्यकता असतानाही सुलोचना बेोले यांनी पैशासह बॅग परत केली. त्यांचा हा प्रमाणिपणा बघून मी थक्क झालो, असेही ते म्हणाले.
सुलोचना बेले म्हणाल्या, कामाच्या व्यतिरिक्त कुणी दिलेला पैसा मी स्वीकारला नाही. कष्टातून मिळालेल्या पैशाचेच मला समाधान आहे.
सापडलेल्या बॅगेतील पैसा हा माझ्या मिळकतीचा नव्हता. तो कुणाच्यातरी कामाचा होता. त्यामुळे मी तो परत केला. त्याचे मला समाधान आहे, असे उत्तर त्यांनी याप्रसंगी देऊन गरिबीपेक्षा आपल्या मनाचा मोठेपणाच सिद्ध केला.