स्थानिक गांधी विचार मंच व सार्वजनिक वाचनालयाच्या संयुक्त विद्यमाने प्रखर गांधीवादी, सवरेदयी विचारवंत आणि खऱ्या अर्थाने स्वातंत्र्यसेनानी ठाकूरदास बंग यांना सार्वजनिक वाचनालयाचे कार्यवाह डॉ.जयंत आठवले यांच्या अध्यक्षतेखाली श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. प्रमुख वक्ते ठाकूरदास बंग यांच्याशी लहानपणापासून जवळीक असलेले डॉ.सुधाकर जोशी होते.
प्रास्ताविक गांधी विचार मंचाचे अध्यक्ष प्रा.वामन तुरिले यांनी केले. त्यांनी सप्टेंबर २००४ मध्ये भंडारा येथील ज.मु.पटेल महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना, खुला मंच द्वारा आयोजित ठाकूरदास बंग यांच्या ‘लोकस्वराज्य’ या विषयावरील व्याख्यानाची आणि प्रा.ठाकूरदास बंग व विद्यार्थी यांच्यात रंगलेल्या ‘स्वेच्छा दारिद्रय़’ व ‘स्वदेशीचा वापर’ या विषयांवरील चर्चेची याप्रसंगी आठवण करून दिली. बंग यांनी विद्यार्थ्यांना समाजाकरिता ‘समयदान’ करा, असे आवाहन केले होते.
डॉ.सुधाकर जोशी यांनी डॉ.अभय बंग यांच्याबरोबर शिकत असतांना संस्कार देणारे गांधीतत्त्वांनी झपाटलेले, गांधी, विनोबा, जयप्रकाश नारायण यांच्यावरील भक्तिभावाने, देशाकरता मरेपर्यंत झटणारे, सतत देशसेवेकरिता पायाला भिंगरी लावून सतत प्रवास करणारे, रेल्वेच्या प्रवासातही योग-प्राणायाम न सोडणारे, कधीच निराश न होणारे ठाकूरदास बंग श्रोत्यांसमोर उभे केले.
उपस्थितांपैकी डॉ.प्रा.जयश्री सातोकर, छाया कावळे आणि विलास केजरकर या समाजसेवी कार्यकर्त्यांनीही विचार व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात डॉ.जयंत आठवले म्हणाले, ठाकूरदास बंग निस्वार्थी समाजसेवा व साधी राहणीचा आदर्श होते.
गांधीजींच्या आर्थिक विचारांचे ते अभ्यासक होते. असे ध्येयवेडे कोटय़वधीत एखादेच, असेही ते म्हणाले. आभार विलास केजरकर यांनी मानले.