एखादा दुर्धर आजार अथवा अपघातामुळे कोमात जाणारा रुग्ण शुद्धीवर कधी येईल याचा नेम नसतो. बहुतांशी अशा रुग्णांची ‘जैसे थे’ अवस्थेत रुग्णालयातून घरी पाठवणी केली जाते. मात्र घरी हेळसांड होऊन रुग्णाच्या जिवावर बेतू शकते. परिणामी, आता परदेशातील रुग्णालयांच्या धर्तीवर मुंबईतील रुग्णालयांमध्ये कोमातील रुग्णांची काळजी घेणारा ‘हॉस्पाईस’ कक्ष सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. त्यामुळे कोमात गेलेल्या रुग्णांना नवसंजीवनी मिळू शकते.
अपघात अथवा दुर्धर आजारामुळे अनेक जण कोमात जाऊन अंथरुणाला खिळून राहतात. काही वेळा आसपासच्या शहरांतून अत्यवस्थेतील रुग्ण उपचारासाठी मुंबईत येतात आणि कोमात जातात. अशा रुग्णांना फार काळ रुग्णालयांमध्ये ठेवून घेणे शक्य होत नाही. काही दिवस वाट पाहून संबंधित रुग्णाला ‘जैसे थे’ अवस्थेत रुग्णालयातून घरी पाठवले जाते. रुग्णालयामध्ये ज्या पद्धतीने रुग्णाची देखभाल होऊ शकते तशी त्याच्या घरी नातेवाईकांकडून होऊ शकत नाही. तसेच आर्थिक स्थिती बिकट असलेल्या नातेवाईकांना रुग्णाची घरी काळजी घेणे शक्यही होत नाही. आरोग्याच्या दृष्टीने हेळसांड झाल्यामुळे प्रकृती खालावून वेळप्रसंगी रुग्ण दगावू शकतो. अशा अनेक घटना देशाची आर्थिक राजधानी म्हणून बिरुद मिरविणाऱ्या मुंबईत घडल्या आहेत. तब्बल ४२ वर्षे कोमात असतानाही डॉक्टर आणि परिचारिकांनी केलेल्या देखभालीमुळे आपल्यात राहिलेली अरुणा शानबाग हा अपवाद म्हणावा लागेल.
कोमात गेलेल्या रुग्णांची देखभाल करण्यासाठी विदेशातील रुग्णालयांमध्ये ‘हॉस्पाईस’ कक्ष सज्ज असतो. या कक्षामध्ये डॉक्टर, परिचारिका आणि अन्य कर्मचारी सदैव सज्ज असतात. दाखल असलेल्या रुग्णाच्या आरोग्याची योग्य प्रकारे ते काळजी घेत असतात. अशा पद्धतीचे ‘हॉस्पाईस’ मुंबईमधील रुग्णालयांमध्ये सुरू करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
केईएम रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिकांनी देखभाल केल्यामुळे कोमात गेलेली परिचारिका अरुणा शानबाग तब्बल ४२ वर्षे आपल्यात होती. मात्र तशी सुविधा कोमात गेलेल्या अन्य रुग्णांना रुग्णालयात मिळू शकत नाही. अंथरुणाला खिळलेल्या अशा रुग्णांसाठी पालिकेने आपल्या रुग्णालयांमध्ये ‘हॉस्पाईस’ कक्ष सुरू करावे. रुग्णांच्या देखभालीसाठी तेथे डॉक्टर, परिचारिकांसह आवश्यक तो कर्मचारी वर्ग आणि सुविधा उपलब्ध कराव्यात. या योजनेला ‘परिचारिका अरुणा शानबाग योजना’ असे नाव द्यावे, तर ती अरुणासाठी खरी श्रद्धांजली ठरेल, असे सांगत शिवसेना नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी पालिका सभागृहात याबाबत मागणी करणार असल्याचे स्पष्ट केले.