राज्यात सर्वाधिक आदिवासी असणाऱ्या ठाणे जिल्ह्य़ात आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची कमी पडणारी संख्या लक्षात घेऊन ठाणे आदिवासी विभागाने केलेल्या मागणीनुसार सिडकोने घणसोली येथील सेक्टर १३मध्ये वसतिगृहासाठी जागा जाहीर केली आहे. सिडको संचालक मंडळाच्या सोमवारी झालेल्या संचालक बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
राज्यात ठाणे जिल्हा हा सर्वाधिक आदिवासी असलेला जिल्हा आहे.  वाडा, जव्हार, मोखाडा, तलासरी येथे मोठय़ा प्रमाणात आदिवासी शाळा आणि वसतिगृहे आहेत पण शहरी भागांत या वसतिगृहाची कमतरता आहे. उच्च शिक्षणासाठी शहरात येणाऱ्या या विद्यार्थ्यांना खूप मोठी निवासाची उणीव भासत आली आहे. ठाणे आदिवासी विकास विभागाने सिडकोकडे वसतिगृहासाठी जमीन मागितली होती. त्यानुसार सिडकोने घणसोली सेक्टर १५ येथे ७७८ चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड दिला आहे. त्यामुळे आदिवासी विभागाला या ठिकाणी वसतिगृह बांधण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
याशिवाय नवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्तांसाठी विकसित करण्यात येणाऱ्या पुष्पक नगर भागात नागरी सुविधा पुरविण्यासाठी सिडकोने सुमारे १०० कोटी रुपये खर्चाची कामे काढली आहेत. या पुष्पक नगरमध्ये दहा गावांतील विस्थापित होणाऱ्या सुमारे तीन हजार ग्रामस्थांना स्थलांतरित करण्यात येणार असून सिडकोने या नगराचा आराखडा तयार केला आहे. या ठिकाणी वर्ल्ड क्लास सुविधा देण्याचा प्रयत्न करणार असून त्या ठिकाणच्या सपाटीकरणाचे काम सध्या सुरू  आहे. विमानतळ प्रकल्पात विस्थापित होणाऱ्या दहा गावांतील ग्रामस्थांनी या पुष्पक नगराच्या विकासकामांनाही मध्यंतरी विरोध केला होता, पण आता या कामांना वेग आला असून विरोध करणाऱ्या ग्रामस्थांचा विरोधही मावळत चालला आहे. त्यामुळे सिडकोने या भागातील विकासाकडे लक्ष दिले असून सोमवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत येथील दोन महत्त्वाच्या नागरी कामांना मंजुरी देण्यात आली.