मतदानाबाबत तरुणांमध्ये जनजागृतीची मोहीम राबविल्यानंतर आता मुंबईतील सहकारी गृहनिर्माण संस्थांमधील मतदानाचा टक्का वाढावा यासाठी ‘९०% व्होटिंग चॅलेन्ज’ या नावाने मोहीम राबविण्यात येत आहे.
‘व्हॉलेंटीयर फॉर बेटर इंडिया’ नामक या मोहीमेच्या पहिल्या टप्प्यात मुंबईतील महाविद्यालयीन तरुणांवर लक्ष केंद्रित करण्यात आले होते. मुंबईतील सुमारे ४० महाविद्यालयांमध्ये ही मोहीम राबविण्यात आली. आता दुसऱ्या टप्प्यात शहरातील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना लक्ष्य करून सोसायटीत राहणाऱ्या सदस्यांचा मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. या पदाधिकाऱ्यांनी आपल्या सोसायटीतील किमान ९० टक्के सदस्यांनी मतदान करावे, यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा आहे. त्यासाठी गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून लेखी प्रतिज्ञा घेतली जात आहे. या प्रतिज्ञेचे पत्रक इतर सदस्यांनाही वाटावे आणि मतदानाच्या दिवशी त्यांनी प्रत्यक्ष मतदानाला उतरावे, यासाठी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा करायचा आहे.
या मोहीमेला ‘समर्थ नगर लोखंडवाला कॉम्प्लेक्स को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीज असोसिएशन’ने प्रतिसाद देत १९ एप्रिलला विशेष बैठकच बोलाविली आहे. या बैठकीला ११२ गृहनिर्माण संस्थेचे पदाधिकारी आणि सदस्य हजेरी लावतील असा अंदाज आहे. आपल्या सोसायटीतील सदस्यांचा मतदानाचा टक्का वाढविण्याच्या दृष्टीने या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. अंधेरीच्या लोखंडवाला स्पोर्ट्स क्लब येथे सायंकाळी ६.०० वाजता ही बैठक होईल. या वेळी मतदानाचे महत्त्व सांगणारे एक छोटेसे नाटुकलेही सादर केले जाणार आहे. ‘देशाच्या उभारणीशी संबंधित असलेल्या या मोहीमेचा एक भाग होण्याची संधी आम्हाला मिळाली याबद्दल आम्ही समाधानी आहोत. आमच्या भागातील मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू,’ असे ‘समर्थ नगर लोखंडवाला कॉम्प्लेक्स को-ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटी असोसिएशन’चे सचिव हेमंत नायर यांनी सांगितले. ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’तर्फे देशभरात ही मोहीम सध्या राबविण्यात येत आहे.