सागरी मार्गाने मुंबईवर पुन्हा हल्ला होण्याचा धोका लक्ष्यात घेऊन राज्यातील सागरी सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी माहीमजवळ हॉवरक्राफ्ट पोर्ट उभारण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेदरम्यान हा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी १० एकर जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णयही घेण्यात आला.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज गिरगाव चौपाटी ते वाशी अशा सागरी सुरक्षेची पाहणी करून राज्यातील सागरी सुरक्षेचाही आढावा घेतला. त्यावेळी मुंबईच्या सभोवताली अनेक ठिकाणी सागरी सुरक्षा व्यवस्था कमकुवत असून सगळ्याच बोटींची तटरक्षक दलाकडे नोंदणी नसते. तसेच किनाऱ्यावर येणाऱ्या सर्वच बोटींवर पाळत ठेवून त्यातून संशयास्पद बोटींवर कारवाई करण्यातही अनेक अडचणी येत असल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांना देण्यात आली. मात्र तटरक्षक दलाकडे अत्यंत वेगात जाणारे आणि प्रसंगी जमिनीवर चालणारे हॉवरक्राफ्ट आहेत. त्याचा अधिकप्रमाणात उपयोग करून सागरी सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करता येईल, असेही मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणण्यात आले. त्यावेळी माहीम किनाऱ्याला हॉवरक्राफ्ट पोर्ट उभारून तेथे शीघ्र कृती दल तैनात करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली. त्यासाठी राज्य सरकार १० एकर जागा उपल्बध करून देणार असून अशाच प्रकारे सागरी किनाऱ्यावर आणखी दोन -तीन ठिकाणीही तटरक्षक दलाच्या हॉवरक्राफ्टसाठी स्थानके निर्माण करण्यात येणार आहेत. सागरी मार्गाने होणारी अवैध वाहतूक, दहशतवादी कारवाया यावर काटेकोरपणे लक्ष ठेवून सागरी सुरक्षा अधिक मजबूत करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

खारफुटीच्या संरक्षणासाठी खेकडय़ांची मदत
खारफुटींच्या संरक्षणासाठी आता खेकडय़ांची मदत घेतली जाणार आहे. पॉण्डेचरीमध्ये अशाच प्रकारे खेकडय़ांची पैदास करण्याबरोबरच खारफुटीचेही जतन केले जात असून तीच योजना आता राज्यातही राबविली जाणार आहे. खारफुटीच्या आसपास शेती करणाऱ्यांना तसेच कोळ्यांना खेकडय़ांची पिल्ले दिली जाणार असून त्यांच्या जतनासाठी अनुदानही दिले जाणार आहे. त्यामुळे लोकांना उत्पन्न तर मिळेलच शिवाय खारफुटीचेही संरक्षण होईल, असेही सूत्रांनी सांगितले.