दिल्लीत खासगी टॅक्सी चालकाने एका तरुणीवर बलात्कार केल्याच्या घटनेने देशात खळबळ उडाली आहे. मुंबई आणि इतर शहरात टॅक्सी, रिक्षाने प्रवास करणाऱ्या महिला सुरक्षित आहेत का? असा प्रश्न यानिमित्ताने पुन्हा उपस्थित झाला आहे. खासगी  टॅक्सी पुरविणाऱ्या कंपन्या महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा दावा करत असले तरी इतर सार्वजनिक टॅक्सी, रिक्षाचालकांची खात्री कोण देणार? ठाण्यात वाहतूक पोलिसांनी सुरक्षेसाठी अभिनव अशा ट्रॅफिक स्मार्ट कार्डची सुरुवात केली आहे. मुंबईतही पोलिसांनी एकटय़ाने प्रवास करणाऱ्या महिलांसाठी जीपीएस प्रणालीवर चालणारी एसएमएस सेवा सुरू केली आहे. परंतु दुर्दैवाने बहुतांश महिलांना अद्याप याबाबत माहिती नसल्याचे आढळून आले आहे.
घराबाहेर पडलेल्या प्रत्येकाला वेळी अवेळी टॅक्सी, रिक्षाची गरज लागत असते. त्यासाठी सार्वजनिक टॅक्सी, रिक्षा उपलब्ध आहेत. पण लोकांची गरज आणि सुरक्षितता लक्षात घेऊन शहरांमध्ये आगाऊ नोंदणी करून खासगी टॅक्सी पुरविण्याचा व्यवसाय काही वर्षांपूर्वी सुरू झाला. अनेक मोठय़ा कंपन्या यात उतरल्या आहेत. इतर सार्वजनिक वाहनांपेक्षा या टॅक्सी सुरक्षित मानल्या जातात. पण दिल्लीच्या घटनेने याला छेद दिला आहे. महिलांमध्ये त्यामुळे असुरक्षेची भावना निर्माण झालेली आहे.
‘जीपीएस’द्वारे टॅक्सीवर ‘नजर’
‘ओला कॅब’ या टॅक्सी पुरविणाऱ्या कंपनीने ‘ओला अ‍ॅप्स’ हे सॉफ्टवेअर विकसित केले आहे. त्यामुळे एखादी महिला आमच्या टॅक्सीत बसली की जीपीएस प्रणालीद्वारे तिचा प्रवास कुठे होतो हे आमच्या मुख्य केंद्रात दिसत असते. शिवाय तिच्या कुटुंबियांनी जर ते अ‍ॅप डाऊनलोड केले असेल तर त्यांनाही त्या टॅक्सीचा ट्रॅक राहत असतो असे कंपनीचे विपणन संचालक आनंद सुब्रमण्यम यांनी सांगितले. मुंबईत ४ हजार २०० ओला कॅब्स असून आम्ही प्रत्येक चालकाची पाश्र्वभूमी तपासलेली असते असा दावाही कंपनीने केला आहे.
महिलांसाठी महिला टॅक्सीचालक
‘वीरा कॅब्स’ या कंपनीने केवळ महिला प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन महिला चालकच नेमले आहेत. महिलांसाठी महिलांनी चालवलेली टॅक्सीसेवा असे त्यांच्या कंपनीचे ब्रीद वाक्य आहे.  त्यामुले महिलांना सुरक्षित वाटते, असा कंपनीचा दावा आहे.
महिला प्रवाशांसाठी ‘एसएमएस’ सेवा
‘लोकमान्य टिळक टर्मिनस’वर उतरलेल्या इस्थर अनुह्या या तरुणीला एका टॅक्सीचालकाने लिफ्ट देण्याच्या बहाण्याने निर्जन स्थळी नेले. तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न करून तिची हत्या केली. या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी महिलांसाठी खास ९९६९ ७७७ ८८८ या क्रमांकाची एसएमएस सेवा सुरू केली. . एखादी महिला एकटीने टॅक्सी-रिक्षात बसली तर त्या वाहनाचा क्रमांक या मोबाईल क्रमांकावर एसएमएस करायचा. जीपीएस प्रणालीद्वारे हा क्रमांक नियंत्रण कक्षाला जोडला जातो. त्यामुळे संबंधित टॅक्सी रिक्षाची माहिती पोलिसांना मिळते. ही अतिशय चांगली सेवा असली तरी याबाबत मुली आणि महिलांना माहितीच नाही.
मुंबई पोलिसांची १०० आणि १०३ सेवा
मुंबई पोलिसांनी विशेष हेल्पलाईन व्यतिरिक्त महिलांसाठी अनेक उपाययोजना सुरू केलेल्या आहेत. याबाबत माहिती देताना मुंबई पोलिसांचे प्रवक्ते आणि पोलीस उपायुक्त धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले की, १०० आणि १०३ या दोन क्रमांकावर महिलांनी संकटकाळी संपर्क केला तर अवघ्या ५ ते ७ मिनिटांत पोलीस मदत पोहोचू शकते. महिलांना सुरक्षित वाटावे म्हणून महिला बीट मार्शल्सच्या गस्ती सुरू करण्यात आलेल्या आहेत. रात्री १२ नंतर महिलांनी रेल्वे स्थानकालगतच्या स्टँडमधून टॅक्सी आणि रिक्षा करायाला हवी. या ठिकाणी प्रत्येक महिला प्रवाशाची नोंद आणि चालकाची नोंद ठेवली जाते, असेही ते म्हणाले. रिक्षात-टॅक्सीत बसण्यापूर्वी त्याचा क्रमांक लिहून घ्यायलाच हवा, असे पोलीस सांगतात. हल्ली साध्या फोनमध्येही कॅमेरा असतो. त्यामुळे फोटो काढणे सोपे होते. यामुळे चालकांवर वचक राहतो, असेही कुलकर्णी म्हणाले.
ठाण्यात ‘स्मार्ट आयडी’
ठाणे वाहतूक पोलिसांनी राज्यात प्रथमच ट्रॅफिक स्मार्ट आयडी योजना सुरू केली आहे. रिक्षा चालकाच्या नावासहीत सर्व तपशील तसेच पोलिसांच्या हेल्पलाईनचे क्रमांक ठळकपणे दिलेले असतात. प्रवाशी बसतात त्यांच्या दर्शनीभागावर हे स्मार्ट आयडी चिकटवले जाते. त्यामुळे त्याची सर्व माहिती मिळते. आतापर्यंत ८ हजार रिक्षांवर हे स्मार्ट कार्ड लावण्यात आल्याची माहिती ठाणे वाहतूक पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी दिली. आपली माहिती प्रवाशांकडे आहे, त्यामुळे आपण काही केले तर पकडले जाऊ ही भीती त्या रिक्षाचालकाच्या मनात असते. त्यामुळे ९९ टक्के अनिष्ट प्रकार टळू शकतील, असे करंदीकर म्हणाल्या.