लाल, पिवळा, हिरवा, तपकिरी अशा नानाविध रंगांची होळी.. पण गेल्या काही वर्षांमध्ये हे रंगच आरोग्याला घातक ठरू लागल्याने रंगांचा बेरंग होऊ लागला आहे. त्यावर तोडगा म्हणून पाना, फुला, फळांपासून तयार केलेले कोरडे आणि ओले रंग सामाजिक संस्थांनी बाजारात आणले आहेत. पण बेरंग करणाऱ्या घातक रंगांचा वापर अद्याप पुरता बंद झालेला नाही. ‘आधी करून दाखविले, मग सांगितले’ या उक्तीनुसार पर्यावरण मंत्र्यांनी मंत्रिमंडळातील सहकारी, सचिव, अधिकाऱ्यांना तब्बल ५०० किलो पर्यावरणस्नेही रंगांची भेट देऊन जनजागृतीसाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. पर्यावरणस्नेही रंगांची निर्मिती सहज घरच्या घरीही करणे शक्य असून आपणही पर्यावरणाच्या रक्षणात हातभार लावल्याचा आनंद होळीच्या निमित्ताने प्रत्येकाला मिळू शकेल.गेल्या काही वर्षांमध्ये घातक रंगांमुळे त्वचा, डोळे आदींवर परिणाम झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने घातक रंग हद्दपार करण्यासाठी कंबर कसली असून गेल्या काही वर्षांमध्ये निसर्गापासून बनविलेले रंग बाजारात उपलब्ध करण्यास सुरुवात केली आहे. यंदा पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनीही होळीच्या उत्सवातून घातक रंग हद्दपार करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये रामदास कदम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अन्य सहकारी मंत्रिगणांना पर्यावरणस्नेही रंग भेट म्हणून दिले. तसेच विविध खात्यांचे सचिव, वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही होळीची ही भेट पोहोचती करण्यात आली आहे. तसेच नागरिकांनीही झाडांची पाने, फुले, फळांपासून तयार केलेल्या पर्यावरणस्नेही रंगांचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पुण्यातील येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेले कैदी आणि महिला बचत गटांकडून खास पर्यावरणस्नेही रंग बनवून घेतले आहेत. हेच रंग मुख्यमंत्री, मंत्री, सचिव आणि अधिकाऱ्यांना भेट म्हणून देण्यात आले आहेत. बाजारात उपलब्ध असलेल्या याच रंगांनी होळी साजरी करावी, असे आवाहन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून करण्यात आले आहे.

नैसर्गिक रंग कसे बनवाल!
नैसर्गिक रंग निर्मिती अगदी साधी आणि सोपी आहे. झाडांची पाने, फुलांच्या पाकळ्या, फळे यांच्यापासून अगदी सहजगत्या नैसर्गिक रंग बनविता येतात. या रंगांमुळे आरोग्यास कोणताही अपाय होत नसल्याने मुक्तपणे रंगांची उधळणही करता येते. तसेच घातक रंगांप्रमाणे ते दीर्घकाळ अंगावर टिकूनही राहात नाहीत. त्यामुळे सुरक्षित रंगपंचमी साजरी करणे सहज शक्यही होते. स्वत: बनविलेल्या रंगांची उधळण करण्यात काही औरच मजा आहे. तर मग बनवा असे नैसर्गिक रंग..

लाल रंग
रंगपंचमीच्या दिवशी लाल रंगांचे आकर्षण काही औरच असते. लाल रंगात नखशिखान्त भिजून मित्र परिवाराच्या भेटीगाठी घेत दिवसभर फिरणाऱ्या तरुणाईच्या झुंडीच्या झुंडी दृष्टीस पडत असतात. लाल रंग तयार करण्यासाठी रक्तचंदनाचा वापर करता येऊ शकेल. रक्तचंदन आरोग्यासाठी उत्तम मानले जाते. रक्तचंदनाच्या खोडाची भुकटी पाण्यात उकळवून थंड केल्यावर गडद रंग तयार होतो. तो पाण्यात मिसळून रंगपंचमी साजरी करता येते. तसेच मधुमेहींसाठी वरदान ठरणाऱ्या जास्वंदीच्या फुलापासूनही लाल रंग बनविता येतो. जास्वंदीची फुले नाजूक असल्यामुळे ती उन्हाऐवजी सावलीत वाळवून घ्यावीत. त्यापासून तयार केलेली भुकटी पाण्यामध्ये उकळवून घ्यावी. निर्माण होणारे जाड मिश्रण आवश्यकतेनुसार पाण्यात मिसळावे.

पिवळा
हळद, कस्तुरी हळद आणि बेसनाच्या पिठापासून पिवळा रंग तयार करता येतो. कोरडा रंग म्हणून त्याची एकमेकांवर उधळण करता येते. तसेच पिवळ्या झेंडूच्या फुलांच्या पाकळ्या किंवा नाजूक बहाव्याच्या फुलांच्या पाकळ्या सावलीत सुकवून घेतल्यानंतर त्यात बेसनचे पीठ मिसळल्यास कोरडा रंग तयार होईल. ओला रंग तयार करण्यासाठी या फुलांच्या पाकळ्या रात्रभर पाण्यात भिजवत ठेवा. त्यात आवश्यकतेनुसार हळद टाकून मिश्रण चांगले उकळवून घ्या.

हिरवा
हिरवा रंग – गुलमोहर, मेहंदीची पाने आणि गव्हाचे कोंब यांची भुकटी तयार करून रात्रभर एखाद्या पिठामध्ये भिजत ठेवा. कोथिंबीर आणि पालकच्या पानांचा लगदा तयार करून या मिश्रणात मिसळा. म्हणजे हिरवा रंग तयार होईल.

केशरी
पांगाऱ्याच्या फुलांपासून केशरी रंग तयार करता येतो. पांगाऱ्याची फुले सावलीत वाळवून घेतल्यानंतर त्याची भुकटी बनवली की झाला कोरडा रंग तयार. ओला केशरी रंग तयार करण्यासाठी ही फुले रात्रभर पाण्यात भिजवावीत. त्यानंतर हे मिश्रण उकळविल्यानंतर ओला केशरी रंग तयार होतो. या रंगाला सुगंधही असतो.