सोनसाखळी चोर हातात सापडल्यानंतर वर्ष-दोन वर्ष तुरुंगात राहिले तरच अशा गुन्ह्यांना प्रभावी आळा बसू शकतो. या चोरांना ‘संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा’ (मोक्का) लावला तरच हे साध्य होऊ शकते. परंतु अलीकडेच एका प्रकरणात सोनसाखळी चोरांना मोक्का लावता येणार नाही, असा निर्णय न्यायालयाने दिल्याने आता या सोनसाखळी चोरांना रोखायचे कसे, असा प्रश्न पोलिसांना पडला आहे.
साधारणपणे सोनसाखळी चोरीच्या रोज दोन-तीन तरी घटना घडतातच. रफी अहमद किडवाई मार्ग पोलीस ठाण्याने एका तरुणीसह चार सोनसाखळी चोरांविरुद्ध मोक्कान्वये केलेली कारवाई रद्द ठरवून त्यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेनुसार कारवाई करण्याचे आदेश दिल्यामुळे हे सोनसाखळीचोर जामिनावर सुटू शकणार आहेत.
डॉ. सत्यपाल सिंग आयुक्त असताना सोनसाखळी चोरांना मोक्का लावण्यास त्यांनी अनुमती दिली होती. सहायक आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याची त्यासाठी अनुमती लागते. सोनसाखळी चोरांना मोक्का लावण्याची प्रक्रिया पहिल्यांदा माहीम पोलीस ठाण्यापासून सुरू झाली. त्यानंतर अनेक पोलीस ठाण्यांनी त्यांच्या हद्दीतील सोनसाखळी चोरांना मोक्का लावण्यास सुरुवात केली.
सोनसाखळी चोरांविरुद्ध दंड संहितेनुसार कारवाई झाली तर ठरावीक कालावधीत आरोपपत्र दाखल न झाल्यास त्यांना जामीन मिळतो. त्यामुळे ते पुन्हा सोनसाखळी चोरी करण्यास मोकळे होतात. मात्र या सोनसाखळी चोरांना मोक्का लावल्यास त्यांना किमान दोन वर्षांपर्यंत जामीन मिळत नाही. त्यामुळे सोनसाखळीचोर तुरुंगात अडकून पडतो आणि परिणामी गुन्हे कमी होतात.
रफी अहमद किडवाई मार्ग पोलिसांनी सोनसाखळी चोरी करणाऱ्या दोघांना मुद्देमालासह अटक केली होती. त्यांच्या इतर दोन साथीदारांसह तरुणीलाही अटक केली होती. यापैकी दोघांविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात दहाहून अधिक गुन्हे असल्यामुळे त्यांच्याविरुद्ध मोक्कान्वये कारवाई केली होती. मात्र या कारवाईला मोक्का न्यायालयात आव्हान देण्यात आले. या आरोपींना मोक्का लागू शकत नाही, हा अ‍ॅड. राजेश श्रीवास्तव यांचा युक्तीवाद न्यायालयाने मान्य केला आणि या आरोपींवरील मोक्का काढून टाकण्याचे आदेश दिले. या निकालामुळे पोलीस हादरले आहेत. आता इतर सोनसाखळी चोरांवर लावण्यात आलेला मोक्का रद्द होऊन ते पुन्हा मोकाट सुटतील, अशी भीती त्यांना वाटत आहे.

सोनसाखळी चोरांवरील मोक्का रद्द करण्यात आल्या प्रकरणी प्रत्यक्ष निकाल पाहूनच मत व्यक्त करता येईल, सोनसाखळी चोरांना आळा घालणे महत्त्वाचे आहे. त्यासाठीच पोलिसांना रस्त्यावर येऊन बंदोबस्त करण्यास सांगितले आहे. त्यामुळे सोनसाखळी चोरांना नक्कीच आळा बसला आहे. मोक्कासारख्या कायद्यामुळेही या चोरांना आळा बसला होता. आता दुसरा पर्याय तपासावा लागेल –
धनंजय कमलाकर   
पोलीस सहआयुक्त
(कायदा व सुव्यवस्था)

सोनसाखळी चोर हे संघटित गुन्हेगारी टोळ्यांशी संबंधित असतील तरच त्यांना मोक्का लागू शकतो. अन्यथा त्यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेनुसारच कारवाई होऊ शकते. आपण तोच युक्तिवाद न्यायालयात केला आणि मोक्का न्यायालयाने तो ग्राह्य़ धरला –
अ‍ॅड. राजेश श्रीवास्तव