केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (सीबीएसई) बारावीचा निकाल आज दुपारी घोषित करण्यात आला असून विदर्भातून अरुषा केळकर हिने ९७.४ टक्के गुण प्राप्त करून विज्ञान शाखेत प्रथम क्रमांक मिळवला आहे. ध्रुव डागा आणि अभिश्री काबरा या विद्यार्थ्यांना प्रत्येकी ९७.४ गुणांसह वेगवेगळ्या विद्याशाखेत ९७.०४ टक्के गुण प्राप्त करून सर्वोत्तम कामगिरी बजावली आहे.
अभिश्री काबरा आणि ध्रुव डागा यांनी प्रत्येकी ९७.०४ टक्के गुण संपादित करून वाणिज्य विद्याशाखेतून प्रथम येण्याचा मान मिळवला. हे दोघेही सिव्हिल लाईन्समधील भारतीय विद्या भवन्सचे विद्यार्थी आहेत. विज्ञान विद्याशाखेतून सेंटर पॉईंटची अरुषा केळकर हिने ९७.०४ टक्के गुण पटकावले. भवन्सच्या श्रीकृष्णनगर शाखेतील ऐश्वर्या कायंदे हिने ९६.२ टक्के गुण प्राप्त करून मानव्यशास्त्रामध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे, तर शाद मिर्झा हिने ९५ टक्के गुण प्राप्त करून द्वितीय क्रमांक मिळवला आहे.
अरुषा केळकर हिला ९७.४, सुदीप्ता मुखर्जी हिला ९६.०८ आणि जय पटेल याने ९६.२ टक्के विज्ञान विद्याशाखेत गुण प्राप्त केले आहेत. कॉमर्समध्ये ध्रुव डागा याने ९७.४, अभिश्री काबरा हिने ९७.४, भरत गुरनारी आणि यामिनी टेंभुर्णीकर यांनी प्रत्येकी ९७ टक्के गुण प्राप्त केले. नाझिया हक हिने कॉमर्समधून ९५ टक्के गुण प्राप्त केले. कलाशाखेत द्वितीय आलेली शाद ही काटोल मार्गावरील सेंटर पॉईंटची विद्यार्थिनी आहे.
अरुषाला विमानशास्त्र अभियंता व्हायचंय
अरुषा म्हणजे सूर्याचे पहिले किरण. अरुषा ही काटोल मार्गावरील सेंटर पॉईंटची विद्यार्थिनी असून तिने दहावीत ९८ टक्के गुण पटकावून याच शाळेत ती प्रथम आली होती, हे विशेष. वर्गात शिकवले त्याकडे नीट लक्ष देणे आणि नियमित अभ्यासामुळेच ९७.४ टक्के गुण प्राप्त झाल्याचे तिने सांगितले. अरुषाला विमानशास्त्र अभियांत्रिकीमध्ये रस आहे. बारावीत तिने खाजगी शिकवणी वर्ग केले नाहीत. तिने जेईई (मुख्य) परीक्षा दिली असून त्यात तिला १७२ गुण, तर जेईई अ‍ॅडव्हान्सची परीक्षा तिने नुकतीच दिली आहे. अरुषाची आई डॉ. आरती आणि वडील शैलेश केळकर दोघेही वैद्यकीय क्षेत्रात आघाडीवर आहेत.
‘शाद’ला नागरी सेवांमध्ये रस
‘शाद’चा अर्थ आनंद, असा होतो. शादच्या यशाने मिर्झा कुटुंबात आनंदाची लहर निर्माण झाली. शादसाठी हा सुखद धक्काच होता. कारण, तिला ९५ टक्के गुणांची अपेक्षा नव्हती. तिच्या यशाने वडील अ‍ॅड. फिरदोस मिर्झाही हुरळून गेले.
केवळ करिअरच्या मागे न धावता विद्यार्थ्यांनी त्यांच्या आवडत्या विषयात आनंद मिळवून शिक्षण पुरे करावे, अशी त्यांची इच्छा त्यांनी शादजवळ व्यक्त केली.
शादने वडिलांचा सल्ला शिरोधार्य मानून तिच्या साहित्य आणि इतिहास हे मानव्यशास्त्राच्या विषयात प्रवेश घेत त्यात गती मिळवली आणि आज तिने त्यात नेत्रदीपक कामगिरी केली. तिला केंद्रीय नागरी सेवांमध्ये विशेष रस असून त्या दृष्टीनेच तिने मानव्यशास्त्रांची निवड केली आहे. शादने तिच्या यशाचे प्रथम श्रेय तिच्या आईला दिले.