नागपूर विभागीय मंडळांतर्गत घेण्यात आलेल्या मार्च २०१५च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्यांच्या टक्केवारीत मुलींनी बाजी मारली असली तरी सर्वात जास्त गुण घेऊन त्या त्या महाविद्यालयांतून प्रथम येण्याचा मान मुलांनी पटकावला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातून यश चांडक विज्ञान विद्याशाखेतून प्रथम असून त्याने ९७.८५ गुण संपादित केले आहेत तर दुसऱ्या क्रमांकावर शिवाजी विज्ञान महाविद्यालयाचा प्रसाद चन्न्ोवार आणि श्रीया साबू या दोन विद्यार्थ्यांना सामाईक ९७.२३ टक्के गुण प्राप्त झाले आहेत. वाणिज्य शाखेतून डॉ. आंबेडकर महाविद्यालयाची रूपल गुप्ता हिने ९७.०८ टक्के मिळवून बाजी मारली आहे. तर आदर्श विद्या मंदिरची खुशी जैन हिला ९६ टक्के मिळाले तर आंबेडकर महाविद्यालयाची वेदश्रिष्ठा दाबके हिने ९५.३८ टक्के गुण पटकावले आहेत. कला शाखेतून एलएडी महाविद्यालयाची अमृता बारबडीकर हिने ८९.२३ गुण प्राप्त करून लक्षवेधून घेतले.
२१ फेब्रुवारी ते २६ मार्च या कालावधीत घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत एकूण १ लाख ४३ हजार ३१९ नियमित विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली होती. त्यापैकी १ लाख ४३ हजार १६४ नियमित विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते. प्रविष्टांपैकी १ लाख ३१ हजार ८६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यापैकी ६३ हजार ६६५ मुले तर ६७ हजार १९८ मुली उत्तीर्ण झाल्या. मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ८९.८६ टक्के एवढे आहे तर मुलींचे ९४.२९ टक्के असल्याने याही वेळी मुलींनी मुलांना मागे टाकत बाजी मारली. उत्तीर्ण विद्यार्थ्यांची एकूण टक्केवारी ९२.११ टक्के आहे.
नागपूर विभागातील एकूण सहा जिल्ह्य़ांपैकी भंडाऱ्याचा निकाल सर्वात जास्त ९४.६८ टक्के तर गडचिरोलीचा सर्वात कमी ८८.०४ टक्के लागला आहे. भंडारा पाठोपाठ गोंदियाचा ९३.९४ टक्के, नागपूरचा ९२.६८ टक्के, चंद्रपूरचा ९२.१० टक्के आणि वध्र्याचा निकाल ८८.८६ टक्के आहे. नागपूर जिल्ह्य़ात सर्वात जास्त ५७ हजार ९७३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ५३ हजार ७३१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. चंद्रपुरात २५ हजार १३७ विद्यार्थ्यांपैकी २३ हजार १५० उत्तीर्ण झाले. गोंदियाच्या १९ हजार २२० विद्यार्थ्यांपैकी १८ हजार ५६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. वध्र्याच्या १५ हजार ७७८ प्रविष्ट विद्यार्थ्यांपैकी १४ हजार २१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. भंडाऱ्याच्या १२ हजार ७४१ विद्यार्थ्यांपैकी १२ हजार ६३ उत्तीर्ण तर गडचिरोलीच्या १२ हजार ३१५ विद्यार्थ्यांपैकी १० हजार ८४२ विद्यार्थी उत्तीर्ण आहेत.
नागपूर विभागातील शाखा निहाय स्थिती पुढीलप्रमाणे आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा कल विज्ञान शाखेकडे असतो, असे आपण गृहित धरतो. मात्र, कला शाखेत सर्वात जास्त विद्यार्थी प्रविष्ट आहेत, हे विशेष. विज्ञान विद्याशाखेत एकूण ५६ हजार ९७६ विद्यार्थी होते. त्यापैकी ५५ हजार १२८ म्हणजे ९६.७६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कला शाखेत ५९ हजार ४८ विद्यार्थी प्रविष्ट होते. त्यापैकी ५२ हजार ५७ म्हणजे ८८.१६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. वाणिज्य शाखेत १९ हजार ३६८ विद्यार्थ्यांपैकी १७ हजार ७२७ म्हणजे ९१.५३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
शिवाय एमसीव्हीसीच्या ७ हजार ७७२ प्रविष्ट विद्यार्थ्यांपैकी ६ हजार ९५१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. हे प्रमाण ८९.४४ टक्के आहे. विद्यार्थ्यांची मेहनत आणि शिक्षकांचे सहकार्य यामुळे उत्तीर्ण होणाऱ्यांची टक्केवारी वाढत असल्याचा दावा विभागीय सचिव अनिल पारधी यांनी पत्रकार परिषदेत केला. महत्त्वाचे म्हणजे दरवर्षीच निकालाची टक्केवारी वाढत असून यावर्षी नागपूर विभागाने नव्वदी पार केली आहे.
गेल्या पाच वर्षांची आकडेवारी पाहता २०१०मध्ये ७४.१६ टक्के निकाल होता. तो २०११मध्ये वाढून ६७.१३ टक्के झाला. २०१२- ६८.९३, २०१३- ७३.१० आणि २०१४- ८९.०७ तर यंदा ही टक्केवारी ९२.११ टक्क्यांवर गेली आहे.

एकूण १११ कॉपी प्रकरणे पकडण्यात आली. त्यापैकी १०४ विद्यार्थी दोषी आढळले. सात विद्यार्थी निर्दोष होते. कॉपीची सर्वात जास्त प्रकरणे चंद्रपुरात ३३ तर भंडाऱ्यात सर्वात कमी एकच प्रकरण उघडकीस आल्याचा दावा विभागीय सचिव अनिल पारधी यांनी केला आहे. नागपूर- १३, वर्धा-२२, गडचिरोली- १५ आणि गोंदियात २७ कॉपी बहाद्दरांना पकडण्यात आले.

यावर्षी १३ हजार ७२१ विद्यार्थ्यांनी पुनर्परीक्षार्थी म्हणून नाव नोंदणी केली होती. त्यापैकी १३ हजार ६३९ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यातून ६ हजार ६९६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या निकालाची टक्केवारी ४९.०९ टक्के आहे.

यावर्षी सर्वात कमी ८८.०४ टक्के निकाल गडचिरोली जिल्ह्य़ाचा असला तरी गेल्यावर्षीच्या तुलनेत ८४.३८ तो ३.६६ टक्क्याने वाढला असल्याचे गडचिरोलीचे माध्यमिक शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांनी सांगितले. गेल्यावर्षी ९४ कॉपी प्रकरणे झाली होती. हे प्रमाण यावर्षी १५वर आले आहे. यावेळी कॉपीचे प्रमाणही कमी करण्यात आम्ही यशस्वी झाल्याचा दावा नरड यांनी केला आहे.

विज्ञान शाखा
यश चांडक – ९७.८५ टक्के
प्रसाद चन्न्ोवार – ९७.२३ टक्के
श्रीया साबू – ९७.२३ टक्के
वाणिज्य शाखा
रूपल गुप्ता – ९७.०८ टक्के
खुशी जैन – ९६ टक्के
कला शाखा
अमृता बारबडीकर – ८९.२३

अमरावती विभागाचा निकाल ९२.५० टक्के
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेच्या ऑनलाईन निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. गेल्या वर्षीच्या तुलनेत ०.४५ टक्क्यांची किंचित सुधारणा घडवून आणत यंदा अमरावती विभागाने ९२.५० अशी टक्केवारी गाठली आहे. निकालाच्या टक्केवारीत नऊ विभागीय मंडळांमध्ये अमरावती विभागाने दुसरे स्थान सलग दुसऱ्या वर्षी कायम ठेवले आहे. अमरावती विभागात निकालाच्या टक्केवारीत यंदा वाशीम जिल्ह्य़ाने अव्वल स्थान पटकावले आहे. वाशीम जिल्ह्य़ाचा निकाल ९४.४६ टक्के, यवतमाळ ९२.७५ टक्के, अकोला ९२.७० टक्के, बुलढाणा ९२.५९, तर अमरावती जिल्ह्य़ाचा निकाल ९१.३३ टक्के इतका लागला आहे.