राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेत राज्यात सर्वात कमी निकालाची नोंद नाशिक विभागीय मंडळात झाली. या मंडळाचा निकाल ८८.१३ टक्के लागला. त्या अंतर्गत येणाऱ्या उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव व नंदुरबारच्या तुलनेत नाशिक जिल्हा पिछाडीवर पडल्याचे स्पष्ट झाले आहे. अव्वल क्रमांकावर असणाऱ्या धुळे जिल्ह्यात ९३.७५ तर नाशिकमध्ये सर्वात कमी म्हणजे ८६.४८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तर महाराष्ट्रात या परीक्षेला बसलेल्या १ लाख ४० हजार ८२४ नियमित विद्यार्थ्यांपैकी १ लाख २४ हजार ११५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्णतेत पुन्हा एकदा मुलींचे वर्चस्व राहिले. गतवर्षीच्या तुलनेत नाशिक मंडळाच्या निकालात दोन टक्क्याने घट झाली आहे.
बारावी परीक्षेचा निकाल बुधवारी दुपारी मंडळाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला. दुपारी एकनंतर शहरातील सायबर कॅफे, स्मार्ट फोन आणि घरोघरी संगणकावर हा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थी व पालकांची धावपळ सुरू होती. कुठे दहा रुपये तर कुठे २० रुपये आकारत कॅफे चालकांनी आपली चांदी करून घेतली. निकाल जाहीर झाला असला तरी गुणपत्रिकांचे वितरण गुरुवारी सकाळी अकरा वाजता महाविद्यालयात करण्यात येणार आहे.
नाशिक मंडळात नियमित परीक्षेच्या निकालाचा जिल्हावार विचार केल्यास जळगाव ८७.५९ तर नंदुरबार ८८.५९ अशी टक्केवारी आहे. शाखानिहाय विचार करता विज्ञान शाखेतील ५१ हजार २६९, कला शाखेतील ५० हजार ४६७ तर वाणिज्य शाखेतील १७ हजार ३३० आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांतर्गत ५०४९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विज्ञान शाखेत उत्तीर्ण होणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे ९६ टक्के तर सर्वात कमी निकाल कला शाखेचा ८१.१४ टक्के आहे. मंडळात सर्व शाखांचे मिळून ६०६४ विद्यार्थ्यांनी विशेष नैपुण्य, ५४ हजार १५२ जणांनी प्रथम, ६० हजार १४ विद्यार्थी द्वितीय आणि ३८८५ विद्यार्थ्यांना उत्तीर्ण श्रेणी मिळाली. राज्यातील मंडळनिहाय निकालांचा विचार करता नाशिक शेवटच्या क्रमांकावर फेकला गेला आहे.
ज्या विद्यार्थ्यांना आपल्या गुणांची पडताळणी करावयाची आहे, त्यांना मूळ गुणपत्रिका प्राप्त झाल्यावर विहित शुल्कासह १५ जून २०१५ पर्यंत मंडळाकडे अर्ज करण्यासाठी मुदत आहे. सप्टेंबर-ऑक्टोंबर २०१५ मध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरावा लागणार असून त्याबाबतच्या तारखा नंतर जाहीर केल्या जाणार आहेत. सर्व विषय उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना संपादणूक सुधारण्यासाठी श्रेणी सुधार योजनेंतर्गत पुन्हा परीक्षेची संधी देण्यात आली आहे. तसेच उत्तरपत्रिकेची छायाप्रत देण्याची सुविधाही उपलब्ध असून इच्छुकांनी त्यासाठी आपापल्या कनिष्ठ महामंडळाकडे अर्ज करावा असे आवाहन मंडळाने केले आहे. ज्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे आहे, त्यांनी उत्तरपत्रिकेची छायाप्रत मिळाल्यापासून पाच दिवसात विभागीय मंडळाकडे अर्ज करणे बंधनकारक आहे.

उत्तीर्णतेत मुलींची बाजी
बारावी परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्यांमध्ये यंदाही मुलींचे वर्चस्व राहिले. ही परीक्षा देणाऱ्या ८८ हजार ६१३ पैकी ७१ हजार ७५६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर ६३ हजार १३० विद्यार्थिनींपैकी ५६ हजार ८७२ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. मुले आणि मुली यांच्या उत्तीर्णतच्या प्रमाणात १० टक्क्यांचा फरक आहे. मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी ८०.९८ तर मुलींची ही टक्केवारी ९०.२३ टक्के आहे.

७१ कॉपीबहाद्दरांवर कारवाई
निकालात घसरण झालेल्या नाशिक मंडळाच्या कार्यक्षेत्रात ७१ कॉपीबहाद्दरांना शिक्षा करण्यात आली. बारावीच्या परीक्षेत ८६ प्रकरणे प्राप्त झाली होती. त्यापैकी १५ विद्यार्थ्यांना चौकशी करून दोषमुक्त करण्यात आले. ७१ विद्यार्थ्यांना शिक्षा करण्यात आली. त्यात नाशिकचे ३०, धुळे ८, जळगाव २४ तर नंदुरबारच्या ९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.