संपूर्ण भारतात महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल या दोन राज्यांत सापांची मोठय़ा प्रमाणावर अदलाबदल होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. सापांचे विष आणि हौसेखातर साप बाळगणे किंवा त्यांचे छायाचित्रण या त्या मागील दोन महत्त्वाच्या बाबी आहेत. त्यामुळे अनेक सापांच्या जाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.
अस्तित्त्वात असलेला प्रत्येकच सर्पमित्र या व्यवसायात नसला तरीही सुमारे ८० टक्के सर्पमित्र या व्यवसायात गुंतले आहेत. विषाला ग्रॅममागे मिळणारी लाखो रुपयांची मागणी त्यासाठी कारणीभूत ठरली आहे. दोन वर्षांपूर्वी नागपुरात हा मोठा व्यवहार आणि त्यातील आरोपींना पकडण्यात वनखात्याला यश आले. त्यानंतर अलीकडेच जून महिन्यात गोवा येथेही सापांच्या विषाचा मोठा व्यवहार उघडकीस आला होता. त्यामुळे सर्प विषाचा व्यवहार रोखण्यात थोडेफार यश येत असले तरीही, निव्वळ छायाचित्रण आणि अभ्यासासाठी होणारी सापांची अदलाबदल रोखण्यात वनखाते अपयशी ठरले आहे. काही सर्पमित्र निव्वळ हौसेखातर आपल्याकडे विविध प्रजातीचे साप असावेत म्हणून हा अदलाबदलीचा व्यवहार करतात. या व्यवहारात आजघडीला महाराष्ट्र आणि बंगाल ही दोन राज्ये आघाडीवर आहेत. या दोन्ही राज्यात सापांच्या विविध प्रजाती आढळून येतात. हा अदलाबदलीचा व्यवहार पैशासाठी नव्हे तर सापांच्या विविध प्रजाती बाळगण्याबाबतच्या चढाओढीतून केला जातो.
वन विभागाने सर्पमित्रांसाठी गाईडलाईन्स दिल्या आहेत. यात ४८ तासांच्या आत सापांना सोडणे, त्याचे छायाचित्रण न करणे, सोशल साईट्सवर सापांचे फोटो न टाकणे आदी बाबींचा समावेश आहे. मात्र, याचा उलट परिस्थिती निर्माण झाली असून, वनविभाग अजूनही त्यावर नियंत्रण मिळवू शकलेले नाही. त्याचवेळी शेजारील राज्य मध्यप्रदेशने यावर नियंत्रण मिळवले आहे. नागपंचमीच्या पाश्र्वभूमीवर मध्यप्रदेशात दोन दिवसांपासूनच ‘कोम्बिंग ऑपरेशन’ला सुरुवात झाली आहे. जबलपूर येथून किंगकोब्राचा बाळगणाऱ्या गारुडींना अटक करण्यात आली. त्यामुळे मध्यप्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्राचे वनखाते या प्रकारांना आळा घालणार का, हाही एक प्रश्नच आहे.
‘सापांच्या अदलाबदलीला लगाम आवश्यक’
या संदर्भात सरपटणाऱ्या प्राण्यांचा अभ्यास करणारे पराग दांडगे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सर्वच सर्पमित्र असे नाहीत, पण केवळ या ८० टक्के सर्पमित्रांमुळे चांगले काम करणाऱ्या सर्पमित्रांवरसुद्धा सर्पशत्रूचे शिक्कामोर्तब होत आहे. सापांच्या विषाच्या व्यवहाराला आळा घालण्याऐवजी त्यांच्या अदलाबदलीला लगाम घालणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.