गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्य़ात सर्वत्र कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असले तरी यवतमाळ आणि नांदेड जिल्ह्य़ाच्या सीमेवरील प्रसिध्द सहस्रकुंड धबधबा सध्या पर्यटकांना कमालीचा आकर्षित करीत आहे.
कोरडय़ा दुष्काळाचे सावट असतांना वरुणराजाची कृपा होऊन धो-धो बरसत असलेल्या पावसाने हा धबधबा ओव्हर फ्लो होऊन वाहत आहे, त्यामुळे  पर्यटकांची सध्या प्रचंड गर्दी उसळली आहे. यवतमाळपासून १८० किलोमीटरवर पनगंगा अभयारण्यात असलेल्या सहस्रकुंडची पावसाळ्यातील मजा लुटण्यासाठी बच्चे कंपनीने पालकांना गळ घालून या नसíगक सौदर्याची मौज लुटणे सुरू केले आहे. यंदा मृग नक्षत्रापासून पावसाने दडी मारली होती, इतकेच नव्हे, तर पाऊसच नसल्याने कोरडा दुष्काळ पडतो की काय, अशी भीती निर्माण झाली होती.
राज्य सरकारने तर ऑगस्टमध्ये १२३ तालुके टंचाईग्रस्त घोषित केले. त्यात यवतमाळ जिल्ह्य़ातील १६ पकी १३ तालुके टंचाईग्रस्त जाहीर झाले. मात्र, ऑगस्ट संपता संपता पावसाने असा काही कहर केला की, वीज पडून ठार झालेल्यांची संख्या जिल्ह्य़ात २६ झाली, तर २ जण पुरात वाहून गेले आणि एक मुलगा विहिरीत बुडून मरण पावला.
या पाश्र्वभूमीवर गेल्या दोन दिवसांपासून धो-धो कोसळत असलेल्या पावसाने पनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे. परिणामी सहस्रकुंडच्या जलधारा २०० फुटावरून आदळतांना होणारा खळखळाट ऐकण्याची आणि जलधारा पाहण्याची मजा काहीच औरच आहे. पर्यटकांची गर्दी लक्षात घेता उमरखेड ते सहस्रकुंड हा ४५ किलोमीटरचा अत्यंत खराब आणि खड्डेच खड्डे असलेला रस्ता दुरुस्त करण्याची मागणी अनेक वर्षांंपासून होत आहे. मात्र, ती दुर्लक्षितच आहे.  

सहस्रकुंड जलविद्युत प्रकल्प
विदर्भ-मराठवाडाा सीमेवरील पनगंगा नदीवर प्रस्तावित सहस्रकुंड जलविद्युत प्रकल्पाला येत्या महिनाभरात मान्यता दिली जाईल, असे आश्वासन तत्कालीन जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांनी गेल्या वर्षी दिले होते. उमरखेडचे कांॅग्रेस आमदार विजय खडसे यांनी विधानसभेत हा प्रश्न लावून धरला होता. तेव्हा मंत्र्यांनी हे आश्वासन दिले होते. प्रकल्पाच्या सर्वेक्षणासाठी ३ कोटी ९० लाख रुपये खर्च झाले आहे. या प्रकल्पाला १२ गावांच्या लोकांनी विरोध केल्याने प्रकल्पात संशोधित  आरखडा तयार करण्यात आला आहे.