पनवेलच्या एसटी आगारामधील विघ्ने दिवसेंदिवस अधिकाधिक वाढत चालली आहेत. दोन दिवसांपूर्वी पनवेल एसटी स्टॅण्डमधील डिझेल संपल्याने उडालेला गोंधळ आणि त्याच दिवशी पुणे येथील रहिवासी असलेले एक वृद्ध महिला स्वच्छतागृहाकडे जात असताना एसटीने त्यांना धडक दिली. यात या वृद्धेला जीव गमवावा लागला. पोलिसांनी या अपघाताला स्टॅण्डमधील खड्डे, बसगाडय़ांचे येण्या-जाण्याचे चुकलेले नियोजन, चालकाचा बेजबाबदारपणा अशा सर्व गोष्टी कारणीभूत असल्याचा निष्कर्ष काढला आहे. त्यामुळे पनवेल आगारात एसटी शिरल्यावर प्रवाशांच्या मनात कोणती आपत्ती समोर येईल, अशी चिंता लागली आहे.  पनवेल एसटी आगारामधून ७० बस रोज धावतात. महिन्याला सुमारे दोन कोटी रुपयांचे उत्पन्न पनवेल आगाराचे आहे. परंतु एकूण उत्पन्न व मध्यवर्ती ठिकाण पाहता हा आगार गैरसोयींनी डबघाईस आला आहे. याला जबाबदार येथील प्रशासन आहे. निवडणुकीपूर्वी पनवेल डेपोमध्ये काँक्रीटीकरणाचे काम सुरू करण्यात आले होते, मात्र जेथे बस थांबतात तिथला भाग तसाच खडय़ांनी अजूनही भरलेला आहे. येथेच हा अपघात झाला. अपघातामध्ये बळी गेलेल्या महिलेचे नाव लक्ष्मीबाईक करके (६५) असे आहे. करके या कुर्ला येथून स्वारगेट असा प्रवास करत होत्या. आगारात असलेल्या स्वच्छतागृहाकडे जात असताना परळ ते सातारा या पल्ल्यावर धावणाऱ्या बसने करके यांना धडक दिली. या गाडीवरील चालक संजीवन गोंजारी याला पोलीस उपनिरीक्षक गंधारे यांनी अटक केली. गोंजारीकडे गाडी डेपोमध्ये आल्यावर भरधाव वेगाने का चालवीत होता, याची विचारणा पोलीस करत होते. मात्र डेपोमधील खड्डे पाहून या खड्डय़ांमुळे हा अपघात झाला का, अशा शक्यतेने पोलीस अपघाताची चौकशी करत आहेत. लक्ष्मीबाई यांच्या मृत्यूनंतर तरी पनवेलच्या आगार व्यवस्थापकांना प्रवाशांसाठी सुरक्षेसाठी काही करावे असे वाटते का, हा प्रश्न आहे.  अशीच परिस्थिती पनवेलच्या डिझेलपंपाच्या ठणाण्याने दोन दिवसांअगोदर प्रवाशांवर ओढवली होती. सुट्टीच्या काळात बसगाडय़ांचे प्रमाण वाढणार याची जाणीव आगार व्यवस्थापकांना नसल्याने मुंबई, ठाणे, कुर्ला, परळ या डेपोमधून सुटणाऱ्या आगारप्रमुखांना तसे ते कळवू शकले नाहीत. याचा नाहक फटका प्रवाशांना सहन करावा लागला.

पनवेल डेपोमध्ये नुकत्याच झालेल्या प्रवाशाच्या अपघाती मृत्युमुळे डेपोमध्ये बाहेरून येणाऱ्या बसगाडय़ांसाठी नवीन शेड उभारून पर्यायी व्यवस्था करावी लागेल. बसमधून उतरताना मागोमाग ही बस अचानक आल्याने हा अपघात घडला. १५ दिवसांच्या आत एसटी डेपोमधील अंतर्गत काँक्रीटीकरणाच्या कामाला सुरुवात होईल. त्यामुळे खडय़ांचा प्रश्न निकाली निघेल.
आर. जी. परदेशी, व्यवस्थापक, पनवेल आगार.