वन्यप्राण्यांच्या भ्रमणमार्गातील मानवी अडथळे आणि कॉरिडॉरचे निकष डावलले जाणे, या दोन्ही बाबी वन्यप्राण्यांच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरत असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे. तीन दिवसांपूर्वी गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली वनखात्याच्या कार्यालयाजवळ दुर्मीळ गटात मोडणाऱ्या कोल्ह्य़ाचा अपघाती मृत्यू झाला. विशेष म्हणजे, या जिल्ह्य़ात वन्यप्राणीच नसल्याचा दावा येथील वनाधिकारी करत असताना कोल्ह्य़ाच्या अपघाती मृत्यूने अधिकाऱ्यांचे पितळ उघडे पडले आहे.
राष्ट्रीय महामार्गच नव्हे, तर अभयारण्यातील बफर क्षेत्रालगतचे रस्ते दिवसेंदिवस वन्यप्राण्यांसाठी कर्दनकाळ ठरत आहेत. या मार्गावरून भरधाव जाणाऱ्या वाहनाने वन्यप्राण्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. राष्ट्रीय महामार्ग हे निमित्तमात्र असले तरीही बफरलगत वन्यप्राण्यांच्या अपघाती मृत्यूची मालिका मोठी आहे. बफरलगतच्या रस्त्यांवर ‘स्पीड ब्रेकर’ व बफरमधील गावात जाण्याकरिता वनखात्याच्या चौक्या आवश्यक आहे. मात्र, या आवश्यक बाबींकडेच वनखात्याकडून दुर्लक्ष केले जात आहे. चौक्यांवर वन कर्मचारी असला तरीही कोणतेही कारण सांगून कुणालाही आत सर्रासपणे प्रवेश दिला जातो. अशा वेळी वन्यप्राण्यांच्या शिकारीचा धोकाही वाढण्याची शक्यता असते. रात्रीच्या वेळेसच वन्यप्राण्यांच्या अपघाताची शक्यता अधिक असते. कारण, रात्री वाहनचालक भरधाव वाहने दामटवतात. वन्यप्राण्यांचे अनेक अपघाती मृत्यू रात्रीच झालेले आहेत. ‘हा वन्यप्राण्यांचा भ्रमणमार्ग आहे. या मार्गावरून वाहनांची गती कमी ठेवावी’ अशा आशयाचे फलक दरम्यानच्या काळात लावण्यात आले. मात्र, ते किती वाहनचालक वाचतात आणि अंमलबजावणी करतात, याविषयी शंकाच आहे. रात्रीच्या वेळी ३० किलोमीटर प्रतितास ही मर्यादा कोणताही वाहनचालक पाळताना दिसत नाही. वनखात्याची उपाययोजना केवळ जंगलापुरती असते. मात्र, बफरलगतच्या रस्त्यांवरून रात्री होणाऱ्या वाहतुकीवर र्निबध लावण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना वनखाते किंवा शासनाकडून घेतली गेलेली नाही.
जंगलालगतच वन्यप्राण्यांची ही अवस्था आहे, तर शहरात येणाऱ्या वन्यप्राण्यांची सुरक्षितता कुणाच्या भरवशावर, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. अलीकडेच नागपूर शहरात वर्धा मार्गावर नीरीजवळ एका मोराचा अपघाती मृत्यू झाला. त्यामुळे वाहनांच्या या वाढलेल्या गतीवरही नियंत्रण आणण्याची गरज आता भासू लागली आहे.

कॉरिडॉरचे निकष
* विभागीय कॉरिडॉर ५०० मीटर रुंद
* उपविभागीय कॉरिडॉर ३०० मीटर रुंद
* स्थानिक कॉरिडॉर ५० मीटर रुंद