मुंबईच्या पर्जन्यवृक्षावर आलेली लोकरी मावा कीटकांची संक्रात हटविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले असून त्यांना खाणारे भुंगे झाडावर सोडण्यात आले आहेत. पुण्याहून मागवलेले हे भुंगे मुंबईच्या झाडांच्या मदतीला येतील का हे लवकरच समजणार आहेत. दरम्यान, कीटकांना मारण्यासाठी झाडांच्या मुळात कडुनिंबाचे कीटकनाशकही टाकण्यात येत आहे.
शहराच्या रस्त्यारस्त्यांवर पसरलेले महाकाय पर्जन्यवृक्ष गेल्या मे महिन्यापासून कीटकांच्या हल्ल्याची शिकार होण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला केवळ दादर-माटुंगा परिसरात असलेल्या या कीटकांनी पाहतापाहता शहरभरातील पर्जन्यवृक्षांलक हल्ला केला आणि हा हा म्हणता हे विस्तीर्ण वृक्ष पानांविना बापुडवाणे दिसू लागले. वृक्षप्रेमींनी याविषयी तक्रार केल्यावर काही ठिकाणी पाण्याचे फवारे मारण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर जून-जुलैच्या जोरदार पावसात या कीटकांची फौज कमी झाल्याने महानगरपालिकेच्या उद्यान विभागातील अधिकाऱ्यांनीही नि:श्वास सोडला होता. मात्र दिवाळीनंतर कुलाब्यापासून दहिसरपर्यंत सर्वत्र पर्जन्यवृक्षांवर ही संक्रात ओढवलेली दिसू लागली. गेल्या वर्षी कीटकांच्या हल्ल्यापुढे हे वृक्ष फांद्या गाळून मरणपंथाला लागले.
या झाडांना वाचवण्यासाठी उद्यान विभागाकडून आता पावले उचलण्यात आली आहेत. उसाच्या शेतीवरही हा कीटक येत असल्याने राहुरी कृषी विद्यापीठाकडून त्यांचा जैविक शत्रू असलेले ‘लेडी बग’ मागवण्यात आले आहेत. त्याचवेळी झाडांच्या मुळातही कीटकनाशक टाकले जात आहे. कांदिवली आणि दहिसर भागातील सुमारे शंभर झाडांवर हा प्रयोग १५ दिवसांपूर्वी करण्यात आल्याची माहिती उद्यान विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. झाडे वाचवण्यासाठी पाण्याचा फवारा, कीटकनाशके, जैविक शत्रू आदी अनेक प्रयोग सुरू आहेत. त्यातील यशापयशातून पुढील मार्ग आखले जातील, असे उद्यान विभागाचे सह आयुक्त एस. एस. शिंदे म्हणाले.
पर्जन्यवृक्ष
साधारण दीडशे वर्षांपूर्वी ही झाडे मुंबईच्या रस्त्यांवर लावण्यात आली. ती मूळची मध्य अमेरिकेची. शहराच्या रस्त्यारस्त्यावर, उद्यानात तब्बल ३२ हजार झाडे आहेत. उंच आणि डेरेडार वाढणाऱ्या या झाडांना मार्च- मे दरम्यान बहर येतो. गुलाबी रंगांची नाजूक फुलांनी ही झाडे सहजी ओळखू येऊ शकतात.
जैविक प्रयोग – काटय़ाने काटा काढणे
पर्जन्यवृक्ष वाचवण्यासाठी राहुरी कृषी विद्यापीठाची मदत घेण्यात आली आहे. ‘लेडी बग’ (लेडी बर्ड बीटल) ही भुंग्याची जात लोकरी मावा ढेकूण खाते. त्यामुळे लोकरी माव्याची संख्या आटोक्यात आणण्यासाठी कांदिवली पश्चिम येथील महात्मा गांधी रस्त्यावरील पर्जन्यवृक्षावर पुण्याहून आणलेले भुंगे सोडण्यात आले आहेत.
आता गवतावरही संक्रांत
व्हाइट मिली बग किंवा कॉटन बग याला मराठीत लोकरी मावा म्हणतात. जास्वंद किंवा पांढऱ्या चाफ्यावर अनेकदा कोवळ्या पानांकडे पांढरा चिकट पदार्थ दिसतो. तो या कीटकांचा परिणाम असतो. हे कीटक काही वेळा अचानक फोफावतात. काही कीटकनाशके फवारून त्यांना आटोक्यात आणले जाते. पाच-सहा वर्षांपूर्वी पश्चिम महाराष्ट्रात उसावर या लोकरी माव्याचा जोरदार हल्ला झाला होता. तेव्हा वेगवेगळे उपाय केले गेले. मात्र या कीटकांवर सर्वसमावेशक अभ्यास झाल्याचे वाचनात नाही, असे भाभा अणुसंशोधन केंद्रातील वनस्पतीतज्ज्ञ डॉ. चंद्रकांत साळुंखे यांनी सांगितले. मुंबईच्या पर्जन्यवृक्षांवर दिसत असलेला हा कीटक अजूनही बीएआरसीमध्ये दिसत नाही. मात्र याठिकाणच्या हिरवळीवर हा कीटक दिसू लागला असल्याचे निरीक्षण डॉ. साळुंखे यांनी नोंदवले.