लाच घेतांना रंगेहाथ सापडलेल्या आर्वीच्या उपविभागीय अधिकाऱ्याच्या झाडाझडतीतून नवनव्या गोष्टी पुढे येत असून विवाहित असणाऱ्या हा प्रथमश्रेणी अधिकारी चांगलाच आंबटशौकिन असल्याचे दिसून येत आहे.     
आर्वीचे उपविभागीय अधिकारी सुनील कोरडे यांना जेसीपीचालक शेतकऱ्यांकडून हे यंत्र पोलीस ठाण्यातून सोडवून घेण्यासाठी २५ हजार रुपयाची लाच घेतांना पकडण्यात आले. याप्रकरणी मध्यस्थी करणारे अ‍ॅड.दीपक मोटवाणी यांच्यासह या दोघांनाही चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.     आरोपी कोरडेंना पकडण्यात आल्यानंतर त्यांची चौकशी सुरू झाली आहे. त्यांची पत्नी व मुलगा अज्ञातवासात गेले असून त्याच्या नागपूरच्या एच.बी. इस्टेट परिसरातील सदनिकेला टाळे ठोकण्यात आले आहेत. कोरडेंच्या आर्वीच्या शासकीय घराची झडती घेण्यात आल्यावर १४४ अश्लिल सी.डी.आढळून आल्या. आरोपी या अश्लिल चित्रफि ती स्वत: खरेदी करून आणायचा, तर काही सीडी त्याने आर्वीतून भाडय़ाने आणल्या. एकटय़ाने किंवा काही वेळा काही कर्मचाऱ्यांसोबत बसून त्यांनी त्याचा विकृत आनंद लुटला. अश्लिल चित्रफि तींचे असेल ते सर्व प्रकार या साठय़ातून दिसून आल्याची माहिती देण्यात आली. याच पुराव्याच्या आधारे कोरडेंवर पुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला असून या अधिकाऱ्याच्या लीलांची खमंग चर्चा सुरू झाली आहे.     
कोरडेंच्या आर्वीच्या घरातून देशीविदेशी दारूचा साठाही आढळला. विविध कंपन्यांची १४ हजार रुपये किमतीची दारू आढळल्याने कोरडे पुन्हा अडचणीत आले. वर्धा जिल्हा दारूबंदी जिल्हा असल्याने असा दारूसाठा बाळगणे बेकायदेशीर ठरून त्याच्यावर पुन्हा एक गुन्हा दाखल झाला. त्याखेरीज भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहेच. रंगेहाथ पकडल्यानंतर त्याच्या घरातून रोख २ लाख ६९ हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत. काही बंॅक खाती सील करण्यात आली असून यापैकी एका खात्यात ६ लाख रुपये जमा असल्याची माहिती देण्यात आली. प्राप्त माहितीनुसार आरोपी कोरडे १९९९ मध्ये नागपूर जिल्ह्य़ात नायब तहसीलदार होते. त्यावेळी त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने लाच घेतल्याप्रकरणी कारवाई केली होती. नागपुरातच कोरडे परिवाराचा आर्थिक व्यवसाय पसरला आहे. आर्वीच्या प्रकरणात प्रवीण देशमुख यांनी तक्रार केली होती. आर्वीलगत रानवाडीच्या जमीन सपाटीकरणाचे काम देशमुख यांच्या जेसीपी यंत्रामार्फ त सुरू होते. हे यंत्र जप्त करीत आरोपी कोरडे याने पैशाची मागणी केली. हे पैसे कोरडेचा हस्तक असलेला अ‍ॅड.दीपक मोटवाणी यांच्या कार्यालयात देत असतांनाच कारवाई झाली. हा सर्व व्यवहार करतांना कोरडेंचे भ्रमणध्वनीद्वारे करण्यात आलेले संभाषण एक महत्वाचा पुरावा ठरला.
दोघांनाही वर्धेच्या न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना सोमवापर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. लाच प्रकरणी गुन्हा दाखल होतांनाच अश्लिल सीडी व विदेशी दारू साठा सापडण्याप्रकरणी अन्य गुन्हेही दाखल झालेत. ३ हजार रुपये किमतीच्या या सीडी आहेत. या प्रत्येक गुन्ह्य़ात आरोपी कोरडेस जामिनासाठी वेगवेगळा अर्ज करावा लागणार आहे. शासकीय वर्तुळात भ्रष्टाचारापेक्षा आंबटशौकिन कोरडेंच्या नाना लीलांचीच आता अधिक चर्चा होत आहे.