मोनोरेलची दिमाखदार चाचणी झाल्यानंतर आता वसरेवा-अंधेरी-घाटकोपर मार्गावरील मुंबईतील पहिल्या मेट्रो रेल्वेचा मार्गही चाचण्यांसाठी सज्ज होत आहे. वसरेवा ते मरोळ दरम्यानच्या टप्प्यातील ओव्हरहेड वायरमधील विद्युतप्रवाह सुरू करण्याचे काम २२ ते ३१ मार्च दरम्यान करण्यात येणार असून त्यामुळे मेट्रो रेल्वेच्या चाचणीचा मार्ग मोकळा होणार आहे.
वसरेवा-अंधेरी-घाटकोपर या मेट्रोमार्गाची लांबी ११.४० किलोमीटर आहे. या प्रकल्पाचा खर्च २३५६ कोटी रुपये असून २००६ मध्ये या मार्गाच्या कामाची सुरुवात झाली. बराच काळ काम रेंगाळल्याने मेट्रो रेल्वे धावणार कधी याची मुंबईकरांना उत्सुकता आहे. गेले वर्षभर विविध प्रकारच्या चाचण्या झाल्यानंतर मोनोरेलची नुकतीच प्रवाश्यांसह चाचणी झोकात पार पडली. त्यामुळे मेट्रो रेल्वेबाबत प्रश्न उपस्थित होत होते. मेट्रो रेल्वेचे पहिल्या टप्प्यातील काम जवळपास संपले आहे. त्यामुळे वसरेवा-नवरंग सिनेमा-अंधेरी-मरोळ या टप्प्यात ओव्हरहेड वायरमधील विद्युत प्रवाह सुरू करण्याचे काम २२ ते ३१ मार्च या कालावधीत हाती घेण्यात येत आहे. विद्युत प्रवाह सुरू झाला की मेट्रोच्या चाचणी प्रक्रियेची सज्जता होण्यास सुरुवात होईल. उपनगरी रेल्वेच्या धर्तीवर तब्बल २५ हजार व्होल्टचा विद्युत प्रवाह मेट्रो रेल्वेच्या ओव्हरेड वायरमधून जाईल. डी. एन. नगर येथील डेपोच्या वाहिन्याही याचवेळी कार्यान्वित करण्यात येणार आहेत.
मेट्रो रेल्वेचे वसरेवा स्थानक ते नवरंग सिनेमा या टप्प्यातील ओव्हरेड वायरचा विद्युत प्रवाह २२ मार्च रोजी सुरू होईल. तर नवरंग सिनेमा ते अंधेरी मेट्रो स्थानक व पुढे मरोळ मेट्रो स्थानक आणि डी. एन. नगर डेपोतील वाहिन्यांचा विद्युत प्रवाह ३१ मार्च २०१३ रोजी सुरू होईल.
ओव्हरहेड वाहिन्यांजवळ न जाण्याचे आवाहन
मेट्रो रेल्वेच्या या टप्प्यातील विद्युत प्रवाह २५ हजार व्होल्ट अशा प्रचंड क्षमतेचा असल्याने त्याच्या आसपास कोणी जाऊ नये, असे आवाहन ‘मुंबई मेट्रो वन प्रा. लि.’च्या प्रवक्त्यांनी केले आहे. या वाहिनीच्या आसपास कसल्याही तारा, धातूचे फलक वा विद्युत प्रवाह आकर्षित करतील अशा कोणत्याही प्रकारच्या वस्तू ओव्हरहेड वायरच्या आसपास असू नयेत याची खबरदारी नागरिकांनी घ्यावी, असेही त्यांनी म्हटले आहे.