राज्य नाटय़ स्पर्धेत नगर केंद्रावर नगर अर्बन बँक स्टाफ कला क्रीडा मंडळाच्या ‘आय अ‍ॅम कॅप्टन मलिक’ या क्षितीज झावरे लिखित, दिग्दर्शित नाटय़प्रयोगास २० हजार रूपयांचे पहिले पारितोषिक मिळाले. या नाटकाची स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी निवड झाली.
सांस्कृतिक संचालनालयाने जाहीर केलेला स्पर्धेचा सविस्तर निकाल याप्रमाणे- दुसरा क्रमांक-१५ हजार रूपये- नि:शब्द वृक्षावर कातरवेळी- (जय बजरंग सामाजिक, शैक्षणिक कला क्रीडा मंडळ, नगर), तिसरा क्रमांक १० हजार रूपये- स्मशानयोगी (रंगकर्मी प्रतिष्ठान, नगर). पुरूष अभिनयाचे रौप्यपदक निनाद बेडेकर (आय अ‍ॅम कॅप्टन मलिक) व स्त्री अभिनयाचे रौप्यपदक मधुरा देशपांडे (नि:शब्द वृक्षावर कातरवेळी) यांनी पटकावले.
इतर वैयक्तिक पारितोषिके, पहिले दुसरे या क्रमाने- दिग्दर्शन-क्षितीज झावरे, रविंद्र काळे. नेपथ्य-अंजली काळे, अमोल खोले. प्रकाश योजना- विलास बडवे, किरण काळे. रंगभूषा- समीक्षा साळुंके, चंद्रकांत सैंदाणे, अभिनय गुणवत्ता प्रमाणपत्र- अच्युत देशमुख, शीतल परदेशी, पल्लवी व्यवहारे, परवीन शेख, अमोल साळवे, दिपक पापडेजा.
नोव्हेंबर १९ ते २८ या दरम्यान स्पर्धेत नगर केंद्रावर एकूण १० नाटय़प्रयोग सादर झाले. समन्वयक म्हणून ज्येष्ठ रंगकर्मी प्रविण कुलकर्णी यांनी काम पाहिले. परिक्षक म्हणून सांस्कृतिक कार्य विभागाने नरेंद्र आमले, शशिकांत लावणीस, सदानंद चव्हाण यांची नियुक्ती केली होती. निकालानंतर सर्व विजेत्या संघांतील कलाकारांनी जल्लोष केला.