सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सव आणि पुणे हे समीकरण प्रस्थापित झाले या घटनेला यंदा साठ वर्षे पूर्ण होत आहेत. या महोत्सवाची रसिकांना जितकी आतुरता असते त्याहूनही अधिक उत्कंठा ही गायक आणि वादक कलाकारांना असते. अनेक कलाकारांना त्यांच्या कलेच्या सादरीकरणासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या आणि त्यांना प्रसिद्धीच्या वलयाची अनुभूती देणाऱ्या या महोत्सवाशी कलाकारांचेही आत्मीयतेचे नाते आहे. महोत्सवाविषयीच्या आपल्या भावना काही कलाकारांनी व्यक्त केल्या आहेत.
पं. अजय पोहनकर
माझ्या वयाच्या बाराव्या वर्षी पं. भीमसेनजी जोशी आणि डॉ. वसंतराव देशपांडे यांनी मला या महोत्सवात सहभागी होण्यासाठीचे निमंत्रण दिले ते वर्ष होते १९५९. मी वयाने लहान असलो तरी माझे गाणे चांगले झाले, असे अजूनही रसिक मला आवर्जून सांगतात. स्वरमंचावर गेल्यानंतर माझ्यावर काहीसे दडपण होते. तर, श्रोत्यांमध्ये साक्षात बालगंधर्व समोर बसलेले होते. त्यावेळी मी झुमरा तालामध्ये यमन राग गायलो होतो हे मला चांगले आठवते. पूर्वी महोत्सवानंतर सर्व कलाकार एकत्रित भोजन करायचे. ‘अरे अजयला पापड खायला आणून द्या’, असे पंडितजी म्हणायचे. ग्रीन रुममध्ये चर्चा करताना मजा येते हे मी अनेकदा अनुभवले आहे. पं. भीमसेन जोशी यांनी या महोत्सवाला अशा पातळीवर नेऊन ठेवले आहे की प्रत्येकालाच महोत्सवाविषयी आपुलकी वाटते. पुण्यात आल्यानंतर महोत्सवाच्या ठिकाणी भेट दिल्यावर मला माहेरी आल्यासारखे वाटते.
यंदाच्या वर्षीचा वत्सलाबाई भीमसेन जोशी पुरस्कार मला जाहीर झाल्यामुळे माझा आनंद द्विगुणित झाला आहे. एक तर, या कुटुंबाशी माझे गेल्या ५५ वर्षांपासूनचे नाते आहे. दुसरे म्हणजे माझी आई सुशीलादेवी पोहनकर ही किराणा घराण्याची गायिका आहे. त्यामुळे माझ्यासाठी हा पुरस्कार म्हणजे गुरुजनांचा आशीर्वादच आहे, अशी माझी भावना आहे.

पं. उल्हास कशाळकर
केवळ पुण्यात आणि महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात नावाजलेला असेच सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाचे वैशिष्टय़ आहे. अर्धशतकाहून अधिक काळ पं. भीमसेनजी हेच या महोत्सवाचे आधारस्तंभ होते. त्यामुळे या महोत्सवाला वेगळा दर्जा मिळाला. २० वर्षांपूर्वी या महोत्सवात माझे पहिल्यांदा गायन झाले होते. येथे कला सादर करूनच अनेक कलाकारांची कारकिर्द घडली हे वास्तव आहे. रसिकांची अशी गर्दी क्वचितच पाहावयास मिळते. यामध्ये केवळ गर्दीच असते असे नाही. तर, संगीतप्रेमी दर्दी रसिकांची संख्यादेखील मोठी आहे.

पं. अतुलकुमार उपाध्ये
पं. भीमसेनजी म्हणजेच आमच्या कलाकारांचे अण्णा यांनी सुरू केलेल्या या महोत्सवाने संगीत प्रसाराचे काम उल्लेखनीय केले आहे. १९८८ मध्ये माझे या महोत्सवामध्ये पहिल्यांदा व्हायोलिनवादन झाले. त्यावेळी माझ्यासारख्या युवा कलाकाराला त्यांनी संधी दिली. येथे कला सादर केल्यानंतर अनेक कलाकारांसाठी जागतिक बाजारपेठ खुली झाली. यंदाच्या महोत्सवामध्ये मला सतारवादक उस्ताद शाहीद परवेज यांच्यासमवेत वादन करण्याची संधी लाभली आहे. पंढरीच्या वारीला ज्या श्रद्धेने जातात त्याच श्रद्धेने रसिक या संगीत पंढरीच्या वारीला येतात. प्रासादिक वातावरणातील कला सादरीकरण हे केवळ अनुभवाच्या पातळीवर राहत नाही. तर, कलाकाराला त्याची अनुभूती येते.

सतीश व्यास
हिंदूस्थानी शास्त्रीय संगीतासाठी एवढा रसिक समुदाय एकत्र येतो ही जगातील एकमेव घटना असेल. सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सव हा पुणे शहरासाठी गौरवास्पद आहे. निखळ संगीताचा आनंद देत श्रोत्यांचे रूपांतर रसिकांमध्ये करण्याची किमया या महोत्सवाने साधली आहे. कलाकारांचा सहभाग जितका महत्त्वाचा तितकेच या महोत्सवाचे संयोजनदेखील महत्त्वाचे आहे. ज्या व्यासपीठावर दिग्गज कलाकारांनी आपली कला सादर केली तेथे कलाविष्काराची संधी मिळणे हे भाग्याचे असते. २००२ मध्ये महोत्सवाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांमध्ये या स्वरमंचावर संतूरवादन करण्याची संधी मला लाभली होती. त्यावेळी मीदेखील ५० वर्षांचा होतो. त्यानंतर गेल्या वर्षीदेखील मी वादन केले होते. आता परत संधी मिळेल याची आतुरतेने वाट पाहतो आहे.

डॉ. प्रभा अत्रे
सवाई गंधर्व संगीत महोत्सव हे गुरू-शिष्य परंपरेचे आदर्श उदाहरण आहे. शिष्याला गुरूविषयी वाटणारे प्रेम, आस्था आणि भक्ती याची प्रचिती या महोत्सवातून दिसते. पं. भीमसेन जोशी यांच्यानंतर त्यांचे चिरंजीव आणि शिष्य श्रीनिवास जोशी ही गुरू-शिष्य परंपरा पुढे नेत आहेत. त्याबद्दल त्यांचे कौतुक करायला हवे. एवढय़ा श्रोत्यांमुळे जो माहोल निर्माण होतो त्यामध्ये युवा पिढीने संगीत श्रवणाचा आनंद घेणे महत्त्वाचे आहे. पुण्यामध्ये अभिमानाने सांगण्यासारख्या ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये निश्चितच हा महोत्सव आहे, असेच म्हणावेसे वाटते. विविध वाहिन्यांवरील रिअॅलिटी शो किंवा चित्रपट संगीताला मिळणारे अवास्तव महत्त्व ध्यानात घेतले तर, अभिरुचीसंपन्न श्रोते घडविणाऱ्या महोत्सवाचे स्थान नक्कीच वरच्या श्रेणीचे आहे.