पहिली ते आठवीपर्यंत सर्वाना शिक्षणाचा हक्क देणारा कायदा असला तरी कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी सामना करणाऱ्या कित्येक मुलांना त्यांच्या बालपणातील अनेक वष्रे केवळ उपचारांसाठी द्यावी लागतात. देशभरातून टाटा रुग्णालयात येणाऱ्या अशा शेकडो मुलांना त्यांच्या शाळेपासून, शिक्षणापासून दूर राहावे लागते. या मुलांना प्राथमिक शिक्षण मिळावे, घरी आणि आपल्या शाळेत परत गेल्यानंतर अभ्यास ओळखीचा वाटावा यासाठी अनेक सामाजिक गट प्रयत्न करत असतात. तरुण डॉक्टरांनी एकत्र येऊन सुरू केलेल्या ‘धन्वंतरी मेडिकल ट्रस्ट’कडूनही आता ‘आय लाइक स्कूल’ हा उपक्रम सुरू होत असून त्यासाठी निधी उभारण्यासाठी मदत घेतली जात आहे ती रद्दीची!
वर्तमानपत्रे, मासिके, पुस्तके रद्दीत काढून महिन्याच्या शेवटी हातखर्चाला पसे मिळवण्याचे दिवस आता तसे मागे पडले आहेत. मॉलमधील पाच हजार रुपयांच्या खरेदीवर पाच टक्के सवलत मिळण्याच्या आशेने घरातील रद्दी तिथे टाकून भरमसाट खरेदी करण्याचे हे दिवस आहेत. मात्र हीच रद्दी काही मुलांना त्यांच्या आयुष्यात स्वावलंबी करू शकते, या जाणिवेतून ‘धन्वंतरी मेडिकल ट्रस्ट’कडून रद्दीतून निधी उभारण्याचा उपक्रम सुरू झाला आहे. ‘टाटा स्मारक रुग्णालया’त उपचारांसाठी देशभरातून मुले येतात. या मुलांच्या उपचारांसाठी तसेच त्यांचा बालपणाचा आनंद टिकवून ठेवण्यासाठी ट्रस्टकडून विविध स्तरांवर प्रयत्न केले जातात.
दहा वर्षांपूर्वी २००५मध्ये तरुण डॉक्टरांनी एकत्र येऊन या संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून ‘क्रािफ्टग स्माइल’ या कार्यक्रमांतर्गत नेहरू तारांगण, नेहरू विज्ञान केंद्र, राणीची बाग, मत्स्यालयात मुलांना नेले जाते. विनाछताच्या बसमधून मुंबई दर्शन, जादूचे प्रयोग, वाढदिवस- दिवाळी साजरी करणे.. अशा अनेक माध्यमांतून मुलांना आनंदी ठेवले जाते, तसेच आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची संधीही मिळते. याशिवाय दर महिन्याला धान्याची पाकिटे, जंतूनाशक औषधे, पालकांचे समुपदेशन अशा उपक्रमातूनही धन्वंतरी मुलांसाठी काम करते.
या सर्व उपक्रमांसाठी आवश्यक असलेला निधी कॉर्पोरेट कार्यालयामधील वर्तमानपत्रे तसेच इतर कागदांची रद्दी तसेच घरोघरी जमा होणारी रद्दी गोळा करून उभारला जातो. दहा वष्रे रद्दीच्या माध्यमातून मुलांच्या चेहऱ्यावर हसू फुलवणाऱ्या धन्वंतरीने आता मुलांना प्राथमिक शिक्षण देण्याचे ठरविले आहे. अनेक लहान मुलांचे आजार हे पूर्ण बरे होऊ शकतात. मात्र प्राथमिक शिक्षणाची अनेक वष्रे वाया गेल्यामुळे या मुलांना घरी परतल्यावर अभ्यासाशी जुळवून घेणे कठीण जाते. या मुलांचा अभ्यासाशी संपर्क राहावा आणि आपल्यालाही भविष्य आहे, याची जाणीव होण्याच्या दृष्टिकोनातून ‘आय लाइक स्कूल’ हा उपक्रम सुरू होत आहे. या उपक्रमासाठी निधीची आवश्यकता असून अधिकाधिक लोकांनी त्यांच्या घरातील रद्दी या मुलांच्या शिक्षणासाठी द्यावी, असे आवाहन धन्वंतरी मेडिकल ट्रस्टच्या डॉ. अमोल यांनी केले आहे. धन्वंतरी संस्थेला देण्यात येणाऱ्या देणग्या ८० जी प्रमाणपत्रानुसार करमुक्त आहेत. संपर्क – ९८२०८९९७९७.