प्रकृती आपल्यापरीने नैसर्गिक समतोल साधत असून स्त्री निर्मिती प्रकृतीची खरी शक्ती आहे. स्त्री भ्रूणहत्या नियती व प्रकृतीच्या विरोधातील पाप आहे. त्यामुळे स्त्री भ्रूणहत्या थांबवण्यासाठी वैचारिक आंदोलनाची खरी गरज असल्याचे मत दत्ता मेघे अभिमत विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी व्यक्त केले.
सक्करदरा चौकातील सेवादल महिला महाविद्यालयात जॉयन्टस् इंटरनॅशनल ग्रुप मेट्रो सिटी व महाविद्यालयातील माजी विद्यार्थी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्त्री भ्रूणहत्या थांबवण्यासाठी आंदोलनाची गरज’ या विषयावरील व्याख्यानात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सेवादल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजय शेंडे, प्राचार्य डॉ. प्रवीण चरडे, प्रशांत नानोटी, राजेश काकडे, पुरुषोत्तम घाटोळे, अशोक सावरकर प्रामुख्याने उपस्थित होते. डॉ. मिश्रा म्हणाले, पुरुषांच्या मनातील असुरक्षिततेचा भाव स्त्री भ्रूणहत्येला जबाबदार आहे. स्त्रीला दान, भेटवस्तू किंवा ओझे न समजता तिचा स्वीकार करणे ही करणे काळाची गरज आहे. वैचारिक मतपरिवर्तन झाल्याशिवाय स्त्री भ्रुणहत्या थांबणे शक्य नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
संजय शेंडे यांनी स्त्री भ्रूणहत्या आणि अंधश्रद्धा यावर सविस्तर प्रकाश टाकून स्त्रीयांनी आपला विकास करण्याचे, तसेच महिलांनी एकत्रित येऊन स्त्री भ्रूणहत्येच्या संदर्भात अभियान राबवण्याचे आवाहन केले. पुरुषोत्तम घाटोळे यांनी स्त्री भ्रूणहत्येच्या विरोधात सर्वानी एकत्रित येऊन लढा देण्याची गरज असल्याचे सांगितले. राजेश काकडे यांनी जॉयन्टस इंटरनॅशनल ग्रुपची भूमिका विशद करून स्त्री भ्रूणहत्येच्या विरोधात जनजागृती करत असल्याचे सांगितले. मुकुंद शेटे यांनी संचालन केले, तर अशोक सावरकर यांनी आभार मानले. कार्यक्रमास महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या.