पुनर्विकास प्रकल्पात मिळालेल्या वाढीव क्षेत्रफळावर मुंद्रांक भरणे आवश्यक असून संबंधित विकासकाकडून विकास करारनाम्याची नोंद करतानाच मुद्रांक भरला जात आहे. परंतु विकास करारनामा नोंदणीकृत न झाल्यास मुद्रांक भरले न गेल्यामुळे त्याची जबाबदारी रहिवाशांवर येऊ शकणार आहे. त्यामुळे रहिवाशांनी सावध व्हावे, असे आव्हान मुंबई ग्राहक पंचायतीने केले आहे.
 मुंबईत सध्या मोठय़ा प्रमाणात जुन्या इमारतींचा पुनर्विकास सुरू आहे. या पुनर्विकासात रहिवाशांना किमान ३०० ते ८६० चौरस फूट पुनर्विकास क्षेत्रफळ मिळणार आहे. या क्षेत्रफळावर रहिवाशांना मुद्रांक भरावा लागणार नाही. मात्र यापेक्षा अधिक क्षेत्रफळ दिल्यास त्याबाबत करारनामा करून त्यावर बाजारभावाने मुद्रांक शुल्क भरावे लागणार आहे. विकासकांकडून विकास करारनामा नोंदणीकृत करताना या संभाव्य वाढीव क्षेत्रफळावर मुद्रांक भरले जात आहे. मात्र विकास करारनामा नोंदणीकृत झालेला नसल्यास त्याचा तात्काळ आग्रह धरण्याची आवश्यकता असल्याचे मत ग्राहक पंचायतीचे अ‍ॅड. शिरीष देशपांडे यांनी केले आहे.
घरांचे भाव गगनाला भिडलेल्या वांद्रेसारख्या परिसरात विकासकांडून रहिवाशांना पुनर्विकास क्षेत्रफळापेक्षा दुप्पट क्षेत्रफळ दिले जात आहे. याबाबत विकासकांनी दोन स्वतंत्र सदनिका असल्याचे संबंधित गृहनिर्माण संस्थेबरोबर झालेल्या विकास करारनाम्यात म्हटले आहे. याबाबत मुद्रांक भरले आहे किंवा नाही, याची खात्री करणे आवश्यक आहे, असेही देशपांडे यांनी सांगितले.
पुनर्विकास प्रकल्पात पुनर्विकासाचे क्षेत्रफळ वगळता वाढीव क्षेत्रफळावर मुद्रांक शुल्क भरावे लागते. विकासकाकडून विकास करारनामा नोंदणीकृत केला जातो तेव्हाच ते भरले जाते. मात्र विकास करारनामा नोंदला गेला आहे किंवा नाही याची माहिती करून घेण्याची खबरदारी रहिवाशांनी घ्यायला हवी, असे मत नोंदणी उपमहानिरीक्षक माणिक गुरसाळ यांनी व्यक्त केले.