तुम्ही वाणिज्य शाखेतून पदवीधर आहात. मात्र तुम्हाला आता संगणक प्रोग्रामिंगमध्ये रस वाटतोय. सध्याच्या शिक्षण पद्धतीमध्ये तुम्ही वाणिज्य शाखेचे असल्यामुळे तुम्हाला हे शिक्षण घेण्यापासून रोखले जात आहे. पण आता हे शिक्षण तुम्हाला घरबसल्या आणि तेही मोफत घेण्याची संधी मिळणार आहे. इतकेच नव्हे तर तुम्ही विहीत कालावधीत अभ्यासक्रम पूर्ण केला आणि परीक्षा उत्तीर्ण झालात तर तुम्हाला प्रमाणपत्रही मिळणार आहे. हे शक्य होणार आहे ते आयआयटी मुंबई सुरू करत असलेल्याwww.iitbombayx.in या संकेतस्थळामुळे.
‘ज्याला जे हवे ते शिकायची मुभा मिळावी’ हा उद्देश डोळय़ासमोर ठेवून जगभरात ऑनलाइन शिक्षणाची पद्धत आकारास येऊ लागली. ही संकल्पना परदेशात चांगलीच रुढ झाली. देशातही ही संकल्पना रुढ व्हावी आणि जास्तीत जास्त लोकांना शिकता यावे यासाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरू होते. यामध्ये आयआयटी मुंबईचाही समावेश होता. सुरुवातीला शिक्षकांना प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने आयआयटी मुंबईतील संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागाने ‘मॅसिव्ह ओपन ऑनलाइन कोर्सेस’ (मूक) ही संकल्पना आणली. या संकल्पनेआधारे देशभरातील १० हजार शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचे उद्दीष्ट समोर ठेवण्यात आले. यानुसार देशभरातील शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणाचा अनुभव आल्यानंतर यादरम्यान संग्रहीत करण्यात आलेली व्याख्याने एडेक्स या आंतरराष्ट्रीय खुल्या ऑनलाइन प्रशिक्षण संकेतस्थळावर अद्ययावत करण्यात आली. या अभ्यासक्रमांना जगभरातील हजारो विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. हा प्रतिसाद लक्षात घेऊन हे अभ्यासक्रम देशातील विद्यार्थ्यांना त्यांच्या भाषेत उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू झाल्याचे प्रा. डॉ. दीपक फाटक यांनी स्पष्ट केले. यासाठी एडेक्सच्या सहकार्याने http://www.iitbombayx.in हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले. या संकेतस्थळाचे अनावरण २६ जानेवारी रोजी दुपारी १२.३० वाजता करण्यात येणार असून त्यानंतर ते सर्वासाठी खुले होणार आहे. यामध्ये ‘इंट्रोडक्शन टू कम्प्युटर प्रोग्रामिंग’, ‘थर्माडायन्मिक्स’, ‘सिंग्नल अँड सिस्टिम्स’ या आयआयटीच्या प्राध्यापकांनी विकसित केलेल्या अभ्यासक्रमांचा समावेश असणार आहे. याचबरोबर कृषी विषयक तीन अभ्यासक्रमांचाही यात समावेश असणार आहे. हे अभ्यासक्रम भारतीय भाषांमध्ये उपलब्ध करून देण्याचे मोठे काम या संकेतस्थळाच्या माध्यमातून केले जाणार असल्याचेही डॉ. फाटक यांनी स्पष्ट केले. सुरुवातीला इंग्रजी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये हे अभ्यासक्रम उपलब्ध होणार आहे. कालांतरांने विविध प्रादेषिक भाषांमध्ये हे अभ्यासक्रम उपलब्ध होणार असून अभ्यासक्रमांच्या संख्येतही वाढ होणार आहे. हे संकेतस्थळ केवळ अभियांत्रिकी आणि विज्ञान या दोन शाखांसाठीच मर्यादित नसून इतर शाखांचे अभ्यासक्रमही यामध्ये शिकविले जाण्याचा मानसही डॉ. फाटक यांनी व्यक्त केला.

संकेतस्थळाची वैशिष्ठय़े
*  संकेतस्थळाचे कोडींग खुले असून कुणीही संगणक जाणकार त्यामध्ये आवश्यक ते बदल करून स्थानिक पातळीवर त्याचा वापर करू शकतो.
*  अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांना प्रमाणपत्र दिले जाणार.
*  एकाच महाविद्यालयात २० हून अधिक विद्यार्थी असतील तर अशा महाविद्यालयांसाठी तज्ज्ञांशी थेट प्रश्नोत्तराची संधी उपलब्ध करून देणार.
*  अधिकाधिक शिक्षकांना प्रशिक्षण देणार.