कल्याण-डोंबिवली शहरातील रिक्षा वाहनतळांवर उभ्या असलेल्या रिक्षांची कल्याणच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडून गेल्या काही महिन्यांत तपासणी करण्यात येत नसल्याने कल्याण-डोंबिवली शहरात अनधिकृत रिक्षांचा सुळसुळाट झाला आहे.
बहुतेक रिक्षा चालक-मालक राजकीय पक्षांशी बांधील, ‘आरटीओ’ कार्यालयाशी संलग्नीत असल्याने कारवाई करण्यात येत नसल्याचे बोलले जाते. डोंबिवलीत काही रिक्षा चालक चक्क घरगुती वापराच्या गॅसचा इंधन म्हणून रिक्षामध्ये वापर करीत आहेत.
यापूर्वीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे महिन्यातून दोन ते तीन वेळा अचानक कल्याण-डोंबिवलीत रिक्षांची तपासणी सुरू करीत असत. या कारवाईत जे अनधिकृत रिक्षा चालक सापडायचे त्यांच्यावर तीन ते चार हजार रुपये दंडाची कारवाई व्हायची. हा भरुदड टाळण्यासाठी रिक्षा चालक प्रामाणिकपणे व्यवसाय करायचे. ‘आरटीओ’ विनायक गुजराथी यांनी पदभार स्वीकारल्यापासून गेल्या दीड वर्षांत अशा अचानक तपासण्या केल्या जात नाहीत, असे काही रिक्षा चालकांनी सांगितले. त्यामुळे दादागिरी, दहशत माजवणारे रिक्षा चालक रिक्षेचे कागदपत्र, स्वत:चे परमिट नसताना व्यवसाय करतात. प्रामाणिकपणे, वाहनतळावर उभे राहून व्यवसाय करणाऱ्या रिक्षा चालकांवर अन्याय करतात, असेही सांगण्यात येत आहे.  वाहतूक पोलीस आणि ‘आरटीओ’ यांच्यात समन्वयाचे वातावरण नसल्याने प्रवाशांना रिक्षा चालकांच्या मनमानीला सामोरे जावे लागते, अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत. वाहतूक पोलीस आणि रिक्षा चालकांचे साटेलोटे असते. एखाद्या रिक्षा चालकाने भाडे नाकारले तर त्याची तक्रार प्रवासी, नाक्यावरील वाहतूक पोलिसांनी संयुक्तपणे पोलीस ठाणे, आरटीओकडे केली तर त्याची गंभीर दखल घेतली तर चालक पुन्हा प्रवाशाबरोबर अरेरावी करीत नाही. असे समन्वयाचे वातावरण वाहतूक पोलीस, आरटीओ आणि स्थानिक पोलिसांमध्ये नसल्याने नागरिकांना रिक्षा चालकांच्या मनमानीला सामोरे जावे लागते, अशा तक्रारी नागरिकांनी केल्या. डोंबिवलीत एका कार्यक्रमात नागरिकांनी रिक्षा चालकांच्या मनमानीवर तक्रारींचा पाढा वाचला. शहरातील अनेक रिक्षा संघटना आहेत. त्यांच्यामध्ये हेवेदावे असल्याने त्याचाही त्रास प्रवाशांना भोगावा लागतो, असे प्रवाशांनी सांगितले.
अन्न व प्रशासन विभागाने रिक्षा चालकांच्या हालचालींवर लक्ष ठेवले तर पोलीस, आरटीओ कर्मचारी, रिक्षा चालक यांच्या संगनमताचा मोठा घोटाळा उघड होईल असे बोलले जाते. दरम्यान, आरटीओ विनायक गुजराथी यांनी भंगार रिक्षा शोधण्याची मोहीम येणाऱ्या आठवडय़ापासून सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले. शाळांच्या काही बैठका सुरू असल्याने कारवाईला विलंब होत असल्याचे ते म्हणाले.

गॅस एजन्सीशी साटेलोटे
कल्याण-डोंबिवलीतील काही रिक्षा चालक रिक्षेमध्ये घरगुती गॅस सििलडरचा वापर करतात. इंधनापेक्षा घरगुती गॅसवरील रिक्षा चांगली कमाई करून देते. याशिवाय इंधन जास्त लागत नाही. ठराविक गॅस एजन्सी चालकांना हाताशी धरून रिक्षेमध्ये गॅस भरण्याचे उद्योग काही रिक्षा चालक करीत आहेत. प्रवाशांना गॅस चेंबरवर बसवून हे रिक्षा चालक प्रवाशांच्या जिवाशी खेळत आहेत. नव तरुण रिक्षा चालक हे उद्योग करीत असल्याचे बोलले जाते. रिक्षेतील गॅस संपला की शहराबाहेरील एखाद्या झुडपाच्या मागे जायाचे. तिथे सिलेंडरमधील गॅस रिक्षामध्ये खाली करायचा. पुन्हा रिकामे सिलेंडर गॅस एजन्सीत नेऊन द्यायचे, अशी पद्धत काही रिक्षा चालक अवलंबत आहेत.